Ahilyanagar news : सरकार स्थापन करण्यासाठी कोणालाच बरोबर घ्यावे लागणारच नाही. १४४ संख्येला स्पष्ट बहुमत आहे. १६०च्या खाली एकही सीट येणार नाही, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते आ. चंद्रकांत पाटील यांनी शिर्डीत व्यक्त केला. १६०च्या वर जे आमच्या सोबत येतील, त्याचे स्वागत असेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

माजी मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सहपरिवार साईदरबारी हजेरी लावून साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी माजी मंत्री पाटील यांच्या हस्ते शिर्डी माझे पंढरपुर आरती करण्यात आली.

यावेळी शिर्डी शहर भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साई संस्थानचे माजी विश्वस्त सचीन तांबे, माजी नगरसेवक गजाननशेर्वेकर, भाजयुमोचे शहराध्यक्ष चेतन कोते यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

साई दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी महाविकास आघाडीच्या पोलबद्दल विचारले असता ते म्हणाले की, एकदा इव्हीएम मशीनमध्ये मतं बंद झाली, की अंदाज व्यक्त करून काही नवीन होणार नसते.

एखादा सर्वेचा अपवाद सोडला तर बाकीचे सगळे सर्व्हे महायुतीचे सरकार येईल,असेच दाखवत आहे. सरकार वन-वे १६०च्या खाली नाही तर पुढे असेल, असा विश्वास व्यक्त केला.

आ. संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच असतील, या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले की, महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय दिल्लीच करेल. आमची संघटना शिस्तीत चालते.

कशातच फूट पडलेली नाही. मुख्यमंत्री शिदे आणि अजितदादांची दिल्लीवर श्रद्धा नाही तर विश्वास आहे. तेव्हा तेसुद्धा असचं म्हणतील की निर्णय दिल्लीने करावा, दिल्ली जे म्हणेल त्याच्या बाहेर आम्ही नाही. सत्ता स्थापनेसाठी आम्हाला जागा कमी पडणार नाही. कमळ, धनुष्यबान आणि घड्याळ यांच्या १६० जागा निवडून येतील.

राज्यपाल भवनात भाजप शाखा आरोपावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, संजय राऊत हा माझा विषय नाही. साईबाबांचे दर्शन घेऊन मी बाहेर आलोय. संजय राऊत करू नका. संजय राऊत हे माझे मित्र, त्यांना तो रोल दिलाय. व्यक्तिगत त्यांना त्याचा खूप त्रास होतो; मात्र त्यांना ती भूमिका दिली आहे. त्यामुळे ते त्यांची भूमिका बजावत आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत.

त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास आहे. आम्ही भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकरांनी तयार केलेली घटना मानतो. त्यांनी लिहिलेल्या घटनेत ज्या संस्था आहेत, त्या ईडी, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग तयार झाल्या, हे विरोधकांना मान्य नाही. एका बाजूने संविधान बचावचा नारा द्यायचा आणि संविधानातील कुठल्याच परंपरा मानायच्या नाहीत, अशी यांची परंपरा असल्याचे पाटील यांनी सांगितले.