Ahilyanagar News : सध्या जिल्ह्यात अनेक भागात बिबट्याचे दर्शन होत असून काही ठिकाणी पाळीव प्राण्यांसह शेतकऱ्यांवर देखील त्याच्याकडून हल्ले करण्यात आल्याचे प्रकार घडत आहेत. नुकतीच अशीच घटना घडली आहे .

श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथमध्ये शेतकरी बाळासाहेब श्रावण नेटवटे हे रात्री शेतातील गहू पिकाला पाणी देत असताना अचानक समोरून बिबट्याने डरकाळी फोडली आणि थेट बाळासाहेब नेटवटे यांच्या दिशेने बिबट्या धावत आला.

मात्र प्रसंगावधान राखून नेटवटे यांनी बिबट्या येत असल्याचे पाहताच आपल्या घराकडे धाव घेतली. घरातून नेटवटे यांनी काठी हातात घेऊन जागेवर आदळली. त्यामुळे बिबट्याने पुन्हा आपली पाठ फिरवली त्यामुळे ‘आज काळ आला होता पण वेळ नव्हती’ अशा स्थिती निर्माण झाली होती.

बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी भयभीत झाल्याचे दिसून येत असून चक्क बिबट्याने शेतकऱ्याच्या अंगावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान लोणी व्यंकनाथ येथे गेल्या एक महिन्यापासून वाड्यां वस्त्यांवर रात्री अप रात्री बिबटे येत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या व पाळीव जनावरांवर बिबट्या हल्ले करत असून आता बिबट्याने शेतकऱ्यांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.

बाळासाहेब नेटवटे यांचे कुटुंब या बिबट्याच्या दहशतीमुळे आजही भयभीत अवस्थेत आहेत. गेल्या वर्षी देखील बिबट्याने या नेटवटे कुटुंबाच्या शेळ्यांवर हल्ला केला होता. आता पुन्हा बिबट्याने याच परिसरात शेतकरी व प्राण्यांवर हल्ला करण्यासाठी बेधडक बिबटे हे धावून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या बिबट्याच्या दहशतमुळे शेतकरी व शेतमजूर कामावर येण्याची धाडस करत नाही. त्यामुळे शेतीउद्योग धोक्यात येताना दिसतो आहे. मागील काही दिवसांपूर्वी लोणी व्यंकनाथ येथील शेतकरी पांडुरंग शेंडे यांच्या शेळींवर हल्ला करून त्या शेळ्यांचा बळी घेतला आहे.

सद्यस्थितीला कारखान्याचे गाळप हंगाम सुरू आहेत. त्यामुळे सर्वत्र ऊसतोड सुरू आहे. उसाचे क्षेत्र मोकळे होत असल्याने बिबट्यांना दडण्यासाठी काहीच राहिले नाही. त्यामुळे बिबटे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आश्रय घेतात. याच दरम्यान ते असे हलले करण्याची शक्यता असते.