Ahilyanagar News
Ahilyanagar News

Ahilyanagar News : श्रीगोंदे पाणीदार तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीगोंदे तालुक्यातील ओढे, नाले, कालवे उन्हाळ्यात आटले आहेत. त्यामुळे चारा अन् पाण्याच्या शोधात मेंढपाळांनी आपला मुक्काम हलवल्याचे चित्र आहे.

मेंढपाळ आपल्या मेंढ्या, त्यांची कोकरे, कुटुंब, जेवणाचे साहित्य, कुत्री, कोंबड्या, लहान मुलं घोड्यांच्या पाठीवर बसून चारा-पाण्याच्या शोधात भटकंती करीत फिरत असल्याची स्थिती आहे.

पावसाळा संपताच घरातील वयोवृद्ध व्यक्तींचे जेवण-पाण्याची सोय करून मेंढपाळ कुटुंब मेंढ्यांच्या चारा आणि पाण्याच्या शोधात शेकडो मैल पायपीट करीत जातात, परंतु यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे.

कारण मेंढ्या जगवण्यासाठी ज्या भागात पाऊस पडला आहे, तेथे या मेंढपाळांना चाऱ्याच्या शोधात निघावे लागले आहे. घरच्यांना विसरून चारा-पाण्याच्या शोधात कुटुंबाला रवाना करताना घरातील वृद्धांना गहिवरून आल्याचे चित्र पाहायला मिळते. परंतु, कुटुंबीयांपेक्षा प्राण्यांचा जीव महत्त्वाचा असल्याने घोड्यांच्या पाठीवर संसारोपयोगी साहित्य लादून मेंढपाळ शेकडो मैलाच्या प्रवासासाठी निघाले आहेत.

यावर्षीचे सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा न करता, रानावनात साजरा करण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. यंदा सुरुवातीलाच पावसाळ्यात पहिल्यापासूनच पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला. पाळीव जनावरांनाही सध्या चारा टंचाई भासत आहे.

त्यात मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना चाऱ्याच्या शोधात घेऊन जात असतात, परंतु पाऊस न झाल्याने माळरानावर मेंढ्यांसाठी चारा उपलब्ध नसल्याने मेंढपाळ चिंतेत पडले आहेत.

त्यामुळे साहजिकच मेंढपाळ कुटुंबीय मेंढ्यांसह चाऱ्याच्या शोधात गावोगावी भटकंती करताना दिसत आहेत, मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी व पाण्यासाठी भटकंती करत असताना मेंढपाळांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते.

मेंढपाळ सध्या घराचा रस्ता धरत असतानाच गावाकडेही चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने ज्या भागात पाणी व चारा उपलब्ध आहे, तिकडे मेंढपाळ कुटुंबीयांनी आपला मोर्चा वळवल्याचे चित्र आहे

चारा-पाणी टंचाईमुळे भटकंतीची वेळ

पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे, कारण मेंढ्या जगवण्यासाठी ज्या भागात चारापाणी उपलब्ध आहे, तिकडे निघावे लागत आहे.

पाळीव जनावरांनाही सध्या पाणी व चारा टंचाई भासत आहे. आम्ही दरवर्षी श्रीगोंदे तालुक्यात चारणीसाठी येत असतो, परंतु यावर्षी पावसाने दडी मारल्याने व या परिसरात पाणी नसल्याने आम्ही आमचा मुक्काम दुसऱ्या ठिकाणी हलवला असल्याचे मेंढपाळ धोंडीबा सरक (मावळ) म्हणाले.