Ahilyanagar News : नगर उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव व इतरांनी ठेकेदाराला मारहाण केली.
चेतन शशिकांत अग्रवाल (वय ३१ रा. बुरूडगाव रस्ता, नगर) असे मारहाण झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे.
मंगलगेट परिसरात सचिन जाधव यांच्या कार्यालयात ही घटना घडली. याप्रकरणी सचिन जाधव यांच्यासह चौघांविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन तुकाराम जाधव (रा. रामचंद्र खुंट), प्रेम काळे, प्रशांत काळे, अभिजित तांबडे (पूर्ण नाव, पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. चेतन यांनी सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वी सचिन यांना वाळवणे गावातील यात्रेच्या दिवशी उसने पैसे दिले होते. ते पैसे मागण्यासाठी चेतन हे त्यांच्या मंगलगेट येथील कार्यालयात १२ मे रोजी दुपारी गेले होते.
चेतन यांनी पैशाची मागणी केली असता, सचिनने शिवीगाळ करून चार लोकांत पैसे मागतो का? असे म्हणून मारहाण केली. धारदार वस्तूने डोक्यात मारून जिवे मारण्याची धमकी दिली. प्रेम, प्रशांत व अभिजित यांनीदेखील मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
मारहाणीचा आणखी एक गुन्हा
लोकसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी मंगलगेट येथे दोन गटांत हाणामारीची घटना घडली. यात जखमी झालेले सचिन जाधव यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
तेथे उपचार घेत असताना बातमीसाठी मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत असलेल्या एकाला सचिन जाधव व त्याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
मोहंमद हसन इदरीस सय्यद (वय २० रा. मुकुंदनगर) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. त्याच्या जबाबावरून सचिन जाधवसह सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.