Ahilyanagar News : लोकसभेला एवढे घवघवीत यश तुम्हाला मिळाले. आमच्या महायुतीची एवढी पीछेहाट झाली. त्यावेळी ईव्हिएमवर का नाही शंका व्यक्त केली. आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या सर्व खासदारांनी त्याचवेळी राजीनामा देऊन टाकायला पाहिजे होता.
श्रीरामपूर मतदारसंघात आमच्या आपापसातील मतभेदांमुळे ती जागा गेली. वास्तविक ती जाण्याचे काही कारण नव्हतं. कर्जत-जामखेड मतदारसंघात स्थानिक परिस्थितीच्या कारणास्तव आमदार राम शिंदे यांचा हजार मतांनी पराभव झाला. अन्यथा जिल्हा हा आपण बारा शून्य केला असता. असे विखे पाटील म्हणाले.
माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी शिर्डीत श्री साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपकार्यकारी अधिकारी संदीप भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, अमित शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली ते म्हणाले की, माझी शरद पवार साहेबांना विनंती आहे की, आपण जाणते राजे आहात, आपण जनाधार गमावलेला आहे, आता तुम्ही कायमस्वरूपी घरी बसा. अनेक लोकांचे वाटोळे तुम्ही केले आहे आणि आणखी जनतेचे व राज्याचे वाटोळे तुम्ही करू नका, असा खोचक टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावाला.
दर्शनानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना विखे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. त्यांच्या मनात किंतु परंतु दिसत नाही. काही माध्यमांनी ते नाराज असल्याचे रान उठवले आहे; पण तसं मला काही वाटत नाही.
अतिशय मनमोकळेपणाने त्यांनी केंद्रीय नेतृत्व जी भूमिका घेईल, ती आम्हाला मान्य असेल असं सांगितलं. राज्याचे मुख्यमंत्री कोण होईल या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी म्हटले की स्वाभाविकच आहे आमच्या पक्षाचे नेतृत्व आमची चॉईस देवेंद्र फडणवीसचं आहे. आपणास मंत्रिमंडळात कोणते खाते मिळेल याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की याबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाच दिले आहे.
पक्ष नेतृत्वाला माझ्याबद्दलचा जो विश्वास आहे त्यामुळे निश्चितपणे चांगली जबाबदारी मला देतील याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी यापुढील निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याच्या वक्तव्यावर विचारले असता त्यांनी म्हटले, की आता पराभव झाल्यानंतर विरोधकांचे एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरु आहे.
ईव्हीएम मशीनवर सध्या खापर फोडले जात आहे, त्यामुळे आमचा पराभव झाला असं शरद पवार आणि सगळेच म्हणतात, या प्रश्नावर उत्तर देताना विखे पाटील यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली.