Home अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘इतके’ शेतकरी कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी पात्र ; १२९ कोटीचे...

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘इतके’ शेतकरी कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी पात्र ; १२९ कोटीचे अनुदान झाले जमा

Ahilyanagar News : राज्य सरकारने २०२३ च्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे कापूस व सोयाबीन पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार रुपये आणि दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार

या अनुदानासाठी राज्य सरकारच्यावतीने निकषानुसार पात्र असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी ४ लाख १२ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यावर १२९ कोटी ४३ लाख २५ हजारांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे.

उर्वरित शिल्लक शेतकऱ्याच्या खात्यावरही मदत लवकरच वर्ग होणार असल्याचे सांगण्यात आले. ऐन नवरात्रोत्सवात शेतकऱ्यांच्या खात्यावर शासकीय मदत देवी पावली आल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील साडे तीने ते चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यांचे कृषी विभागाकडून ई-केवायसी पूर्ण करण्यात आले आहे. या मदत योजनेच्या निकषात राज्य सरकारकडून बदल करण्यात आल्याने पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढत सहा लाखांपर्यंत पोहचणार आहे.

त्यानुसार नगरसह राज्यभर कृषी विभागाकडून माहिती संकलीत करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात ५ लाख ३० हजार शेतकरी राज्य सरकारच्या या मदतीसाठी पात्र आहेत.

यासह ७० ते ७५ हजार सामूहिक खाते असणारे शेतकरी आहेत. त्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेत सामाईक खात्यांमध्ये आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी खातेदारांना दुसऱ्या खातेदारांची संमती घेऊन स्वयंघोषणापत्र सादर करण्यास सांगितले आहे.

जिल्ह्यात कापूस अनुदानासाठी २ लाख १७ हजार ७७८ शेतकरी पात्र आहेत. यातील पहिल्या टप्प्यात १ लाख ७४ हजार १५२ शेतकऱ्यांना ५४ कोटी ७५ लाख ५६ हजारांची मदत मिळाली आहे. तर सोयाबीन अनुदानासाठी ३ लाख १२ हजार ७८० शेतकरी पात्र आहेत. यातील २ लाख ३८ हजार २१९ शेतकऱ्यांना ७४ कोटी ६७ लाखांची मदत मिळाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ५२ हजार ते ४ लाखांपर्यंत शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांची केवायसीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून सोमवारपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यास सुरूवात करण्यात आले आहे.