Ahilyanagar news : राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथे पाणी तापवण्यासाठी हिटर लावत असताना विजेचा शॉक बसल्याने २८ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता घडली. आस्मा कलीम पठाण (वय २८ वर्ष, रा. पिंपरी वळण, ता. राहुरी) असे मयत झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की आसमा कलीम पठाण या आपल्या कुटुंबासह पिंपरी अवघड येथे राहात होत्या. सकाळी पाणी तापवण्यासाठी हिटर लावत असताना त्यांना जोरदार विजेचा शॉक बसला.

या दुर्घटनेत त्या जागीच बेशुद्ध पडल्या. तातडीने त्यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय तपासणीत उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हे करीत आहे. आसमा कलीम पठाण यांच्या पश्चात पती आणि चार मुले असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.