Ahilyanagar News : महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथे मागील आठवड्यात रेल्वे स्टेशनसमोरील हनुमान मंदिरातील श्री हनुमान मूर्तीची विटंबना करण्यात आलेली होती.
हे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी पहाटेच्या दरम्यान गावाबाहेरील यज्ञेसेनी मातेच्या मंदिराच्या उत्तरेकडे असणाऱ्या मुदगलेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस नुकतेच रंगरंगोटी केलेले पुरातन घृष्णेश्वर (महादेव) मंदिरातील शिवलिंगाची तसेच त्यासमोरील असणाऱ्या नंदीची विटंबना अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आल्यामुळे पुणतांबा ग्रामस्थ व युवकवर्ग आक्रमक होत त्यांनी श्रीरामपूर कोपरगाव रस्त्यावर ग्रामस्थांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या घटनेचे परिसरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, याच्या निषेधार्थ गाव व बाजार बंद ठेवण्यात आले. घटनेचा तपास त्वरीत लावावा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गोदावरी नदीच्या काठावरील गावच्या पश्चिम बाजूस असलेल्या पुरातन मंदिरांतील व बाहेरील मूर्तीची विटंबना करण्यात आली. रविवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेची माहिती माजी सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांना समजताच त्यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, राज्य राखीव शिघ्र कृती दलाची तुकडी व मोठ्या फौज फाट्यासह पुणतांब्यात दाखल झाले. विटंबना झालेल्या मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाने पाहणी करून, घटनेचे गांभीर्य ओळखून, ग्रामस्थांच्या मागणीनुसार अहिल्यानगर येथील श्वानपथक व फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचरण करण्यात आले.
पुणतांबा परिसरात धार्मिक स्थळांच्या विटंबनेची दुसरी घटना आहे. १० ते १५ दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकाशेजारील मंदिरातील मूर्तीचीएका माथेफिरू व्यक्तीने विटंबना केली होती. त्यास ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात यश आले होते.
या घटनेनंतर गावात सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होऊन शांतता निर्माण झाली होती; परंतु रविवारी रात्री गोदावरी नदीच्या काठावर असलेल्यामंदिरातील व मदिराच्या बाहेरील मूर्तीची विटंबना करण्यात आली आहे.
ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे समाजातील सर्वच वयोगटातील नागरीक आशा केंद्र चौकात एकत्र आले. तेथे त्यांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी वमने यांनी ग्रामस्थांना रस्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
ग्रामस्थांनी सामंजस्य दाखवत आंदोलन स्थगित करण्यात आले; परंतु घटनेचा तपास तातडीने करून आरोपीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा देत मुक्ताई ज्ञानपिठ पुणतांबाचे उत्तराधीकारी स्वरूपा नंदगिरी यांच्यासह ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.