Ahilyanagar News : सकाळची साडेदहाची वेळ नेहमी प्रमाणे कॉलेज भरले असताना अचानक एसवायबीएच्यावर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्याच इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर चढून शोले स्टाईल पद्धतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकारामुळे महाविद्यालयात एकच धावपळ उडाली. मात्र तात्काळ जामखेड पोलिसांनी धाव घेत त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. सिध्दु धनाजी शिंदे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जामखेड येथील पिपल्स एजुकेशन सोसायटीचे जामखेड महाविद्यालय आहे. याच महाविद्यालयात एसवायबीएच्या वर्गात सिध्दु धनाजी शिंदे (रा.धोंडपारगाव, वय २२ वर्षे) हा शिक्षण घेत आहे. आज नेहमी प्रमाणे कॉलेज भरले असताना सकाळी साडेदहा वाजता विद्यार्थी सिध्दु शिंदे हा थेट महाविद्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावर चढला व मला जगायचे नाही, मी आत्महत्या करणार आहे असे म्हणत आत्महत्येचा प्रयत्न केला.

यावेळी नेमका काय प्रकार आहे हे पहाण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थींची मोठी गर्दी जमली होती. विद्यार्थी व शिक्षक आत्महत्या करु नको से समजावुन सांगत होते.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस स्टेशनचे पो.ह. प्रविण इंगळे, पो.कॉ देवा पळसे, जिब्राईल शेख हे घटनास्थळी आले. यावेळी पो. कॉ. जिब्राईल शेख व विद्यालयातील विद्यार्थी कृष्णा शिरसागर हे आत्महत्या करणार्‍या शिंदे पर्यंत मोठ्या शिताफीने पोहचले व त्यास पकडले. यावेळी त्या विद्यार्थ्यास वाचताना पो.कॉ जिब्राईल शेख हे किरकोळ जखमी झाले.

यानंतर विद्यार्थास पकडुन उपचारासाठी जामखेड येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बाबत अधिक माहिती घेतली असता सदर विद्यार्थ्याचे मानसिक संतुलन बिघडले असुन, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. यानंतर सदर विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले.