Ahilyanagar News :मोसंबी घेऊन भरधाव वेगात जात असलेल्या टेम्पो व बसचा भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. हि घटना शहापूर गावाजवळ झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहापूर गावाजवळ बीड आगाराच्या गेवराई – जालना बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला असून यात वाहकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १४ जण जखमी झाले आहेत.
जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे, बीड जिल्ह्यातील गेवराई येथून हि बस जालन्याकडे होती तर जालन्याहून बीडकडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोची समोरासमोर धडक बसली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणारा आयशर टेम्पो यावेळी दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न करत होता. यातच तो बसवर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला. यावेळी बसमध्ये एकूण २४ प्रवाशी होते, यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाला आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जण गंभीर आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. या अपघातानंतर सर्वत्र साहित्य व मोसंबी यांचा सडा पडला होता.