Ahilyanagar News : लोकसभेच्या निवडणूकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पराभवाचे शल्य हे महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चांगलेच बोचत होते. या पराभवाची उणीव भरुन काढण्यासाठी विधानसभा निवडणूक ही मोठी संधी होती.

मंत्री विखे पाटील यांनी यासाठी पुढाकार घेत महायुतीमध्ये समन्वयाने जिल्ह्यातील जागांचे वाटप केले. प्रचारामध्ये सुसूत्रता आणून योग्य नियोजन केल्याचा परिणाम आज यशामध्ये दिसून आला आहे.

जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे तीन मंत्री तसेच तीन माजी आमदार व विद्यमान खासदाराच्या पत्नीला पराभवाची धूळ चारली आहे. जिल्ह्यातील १२ विधानसभांपैकी १० जागांवर महाविकास आघाडीला पराभवाचा जबरदस्त धक्का दिला. तसेच महाविकास आघाडीचे नेते प्रचारात १२ – ० करू असे महायुतीला वारंवार आव्हान दिले जात होते. मात्र लोकसभेतील पराभवाचा राजकीय बदला घेऊन, विखे पाटील पॅटर्नने अहिल्यानगर जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले तर आहेच.

तसेच १२- ० करण्याचे सांगणाऱ्या महाविकास आघाडीलाच अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले आहे . त्यांचे १२ -० चे आव्हान हवेतच विरले आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या होम पिचवर ऐतिहासिक विजय मिळवितानाच जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा पराभव करण्यात पुन्हा एकदा विखे पॅटर्न यशस्वी ठरला आहे.

महायुतीच्या पाठिशी अहिल्यानगर जिल्ह्याने पुन्हा महायुतीलाच पाठबळ दिल्याचे निकालामधून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच वयोश्री योजना यासह शेतकरी युवक बेरोजगार तरुण सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी असणाऱ्या महायुती सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. जिल्ह्यात पात्र लाभार्थ्यांना मोठ्या संख्येने लाभ मिळवून दिला.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत विकासनिधी उपलब्ध करुन देताना जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासालाही संधी निर्माण करून दिल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वपूर्ण योजनेसाठी त्यांनी विशेष मेहनत घेऊन प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ही योजना गावोगावी व घराघरात पोहोचविण्यात यश मिळविले.

राज्याचे नेते व महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून संबोधले जाणारे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांच्या विरोधात मोठा प्रचार केला. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या प्रचारात त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागल्याची चर्चा आहे.