Ahilyanagar News : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नागरिक क्षेत्र अहिल्यानगर महापालिका हद्दीत समावेशित करण्यासाठी केंद्र स्तरावरून अहवाल मागविला होता. मात्र, आता भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समाविष्ट करण्यास महापालिका प्रशासनाने असमर्थता दर्शविली आहे.
भिंगार व अहिल्यानगर शहर सलग नाही. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या भिंगारचा महापालिकेत समावेश करणे योग्य ठरणार नाही, असा दावा मनपा प्रशासनाने घेतला आहे. मात्र भिंगार परिसर भौगोलिकदृष्ट्या नागरदेवळेशी संलग्न आल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. मनपा प्रशासनाच्या या दाव्यामुळे मात्र भिंगारच्या नागरिकांचे अहिल्यानगर महापालिका हद्दीत समावेश होण्याचे स्वप्न भंगले आहे. आता महापालिकेच्या या निर्णयावर अंतिम निर्णय राज्य स्तरावर होणार आहे.
देशातील सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्ड लगतच्या महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यासंदर्भात केंद्र स्तरावरून हालचाली सुरू आहेत. तसा पत्रव्यवहार यापूर्वी झालेला असून, क्षेत्रफळ, लोकसंख्या, मूलभूत सुविधांची परिस्थिती याचा अहवाल शासनाने मागविला होता. महापालिकेत भिंगारमधील सुमारे १३१ एकर नागरी क्षेत्र वर्ग करण्यासाठी महापालिकेची मंजुरी अपेक्षित असल्याने फेब्रुवारी २०२४ मध्ये महासभेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
मात्र, त्यावर निर्णय झाला नव्हता. तत्कालीन प्रशासकांनी प्रस्ताव सविस्तर माहितीसह फेरसादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ३१ डिसेंबर रोजी नगररचना विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, आयुक्त यशवंत डांगे यांनी यावर निर्णय राखून ठेवला होता.
मंगळवारी आयुक्त यशवंत डांगे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर भिंगार शहर अहिल्यानगर महापालिकेत समाविष्ट करणे योग्य असणार नाही. भिंगार शहर हे भौगोलिक दृष्ट्या अहिल्यानगर शहराशी संलग्न नाही. भिंगारची भौगोलिक सलगता नागरदेवळे गावाशी आहे. त्यामुळे भिंगार महापालिकेत समाविष्ट करणे योग्य नाही, असा निर्णय प्रशासनाने सध्या घेतला आहे.
भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डची लोकसंख्या २८ हजार ९८६ आहे व क्षेत्रफळ १३.१७ चौरस किमी आहे. भिंगार कॅन्टोन्मेंटचा नागरी भाग हा अहिल्यानगर महानगरपालिकेच्या हद्दीपासून साधारण दिड ते दोन किमी लांब असून दोनही नागरी क्षेत्रांच्या दरम्यान संरक्षण विभागाचे क्षेत्र आहे.
भिंगारमधील नागरी क्षेत्र महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्यास कॅन्टोन्मेंटच्या आस्थापनेवरील कार्यरत कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या वेतनाचा भार, भिंगारमध्ये सेवा, सुविधांवर होणार खर्च परवडणारा नाही. त्यामुळे भिंगारच्या मनपातील समावेशास नकार दिला जात असल्याचे बोलले जात आहे.