Ahilyanagar News : जिल्ह्यात सध्या बिबट्याचे हल्ले होत आहेत तर दुसरीकडे वातावरणातील बदलाने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. तसेच खून, दरोडे या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे कधी, कुठे व काय होईल याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे.

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्वच मोठे प्रकल्प भरलेले आहेत, यात कर्जत तालुक्यातील सीना प्रकल्प देखील भरलेला आहे. मात्र सध्या या धरणाच्या लाभदायक क्षेत्रातील अनेक भागात शेतकऱ्यांना सध्या पाण्याची आवश्यकता भासत असल्याने या धरणातून आवर्तन सॊडण्यात आले आहे.

त्यामुळे धरणाच्या कालव्याद्वारे पाणी वाहत आहे. दरम्यान कर्जत तालुक्यातील नांदगाव शिवारात कुकडी कॅनॉलच्या पाण्यात बीड येथील एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी कुकडी कॅनॉलचे पाणी सुरू असताना कॅनॉलच्या चारीतील पाण्यामध्ये मृतदेह वाहत असल्याचे लक्षात आल्याने येथील नागरिकांनी तत्काळ कर्जत पोलिसांना कळविले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.

हा मृतदेह नागरिकांच्या मदतीने कॅनॉलच्या बाहेर काढण्यात आला. या वेळी मृतदेह पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

हा मृतदेह बीड येथील रंजीत सुनील गिरी (वय २३, रा. पाण्याची टाकीजवळ, नाळवंडी रोड, गांधीनगर पेठ बीड, ता. जि.बीड, याचा असल्याचे समजते.

याबाबतची माहिती समजताच जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी कर्जत पोलिस स्टेशनला भेट दिली. पुढील माहिती व तपासाच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

याबाबत कर्जत पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली असून, सदरचा तरुण या ठिकाणी कसा आला का कोणी त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह कालव्यात टाकून दिला. याबाबत अधिकतपास पोलिस करत आहेत.