Ahilyanagar News : मागील आठवड्यात राज्यभरात अत्यंत कडाक्याची थंडी पडली होती. त्यामुळे सर्वजण चांगलेच गारठले होते मात्र आता ढगाळ हवामानामुळे राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. परिणामी थंडीचा कडाका कमी झाला आहे.
रविवारी नागपूर येथे ११.८ अंश सेल्सिअस इतके राज्याचे नीचांकी तापमान नोंदले गेले. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असून त्यानंतर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम राज्याच्या वातावरणावर झाला आहे. अनेक भागांत किमान तापमानात वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीची लाट ओसरली आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी ओसरली असली तरी हवेतील गारठा टिकून आहे. अनेक शहरांचे तापमान ११ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. काही ठिकाणी २० अंश सेल्सिअसच्या जवळ किमान तापमान गेले आहे.
काही भागात सकाळी धुके पडत आहे. दुपारी काही भागात ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात उकाडा जाणवत आहे. दि. २४ आणि २५ डिसेंबर रोजी विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही आर्दता वाढणार असल्याने या ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. २५ ते २९ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. २६ ते २८ डिसेंबरपर्यंतच्या तीन दिवसांत पावसाची शक्यता अधिक आहे.
त्यामुळे यंदा नाताळात थंडी नाही तर पाऊस अनुभवता येणार आहे. पण पुन्हा ३० डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. मुंबईसह कोकण सोडून इतर महाराष्ट्रात २४ डिसेंबरपर्यंत पहाटे पाचचे किमान तापमान सरासरीपेक्षा १ ते ४ अंशाने अधिक असल्यामुळे तेथे थंडी कमी जाणवणार आहे.
जरी थंडी जास्त प्रमाणात असली तरी देखील रब्बीच्या पिकांसाठी थंडी लाभदायक असल्याने हरभरा, गहू , कांदा हि पिके सध्या जोमात आहेत. मात्र आता परत ढगाळ वातावरण व मोठ्या प्रमाणात पडणारे धुके यामुळे या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
राज्यात सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी येथे ३२.१ अंश सेल्सिअस होते. राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई (कुलाबा) २१.५, सांताक्रुझ २०, रत्नागिरी १९.७, डहाणू १८.४, पुणे १५.२, लोहगाव १६.५, जळगाव १५, कोल्हापूर १७.४, महाबळेश्वर १४.२, मालेगाव १२, नाशिक १४, सांगली १६.९, सातारा १५, सोलापूर २०.४, धाराशीव १६.४, छत्रपती संभाजीनगर १५, परभणी १६.५, अमरावती १५.४, बुलढाणा १५.८, ब्रह्मपुरी १४.८, गोंदिया १३.३, नागपूर ११.८, वाशिम १६.८, वर्धा १३.९.