Ahilyanagar News :विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी मतदान व शनिवारी मतमोजणी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टिकोनातून प्रचार कालावधी संपल्यांनतर मतदारसंघातील राजकीय कार्यकत्यांच्या उपस्थितीवर सोमवार (दि. १८) सायंकाळी ६ वाजेपासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आदर्श आचारसंहितेचे निर्बंध लागू करण्यासंदर्भात जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आदेश जारी केले आहेत.

प्रचार कालवाधी संपल्यानंतर, मतदारसंघात कोणताही प्रचार होऊ नये यासाठी, मतदारसंघाच्या बाहेरून आलेले आहेत व जे मतदारसंघाचे मतदार नाहीत, असे राजकीय कार्यकर्ते, प्रचार कार्यकर्ते इत्यादींना नियतिमपणे मतदारसंघामध्ये उपस्थित राहता येणार नाही. कारण प्रचार संपल्यानंतर त्यांच्या निरंतर उपस्थितीमुळे मुक्त व निष्पक्ष मतदानाचे वातावरण धोक्यात येऊ शकते.

अशा सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार २०२४ कालावधी संपताच तत्काळ सोडला आहे, याची सुनिश्चिती करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करावा.

यानुसार जेथे असे लोक निवास आहेत असे कल्याण मंडप, मंगल कार्यालये, सामुहिक सभागृहे इत्यादींची तपासणी करून या परिसरात बाहेरील लोक निवास आहेत किंवा कसे याबाबत शोध घ्यावा.

निवासीगृहे व अतिथीगृहांची पडताळणी करून तेथे राहणाऱ्यांचा यादीचा मागोवा घेत राहणे. मतदारसंघाच्या सीमांवर तपासणी नाके उभारणे आणि मतदारसंघाच्या बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या येण्या- जाण्याचा मागोवा घेणे.

लोकांच्या, समुहांच्या ओळखपत्रांची, ते मतदार आहेत किंवा नाहीत याचा शोध घेण्याच्या दृष्टीने व ओळख पटविण्याच्या दृष्टीने पडताळणी केली जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २५ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात असणार आहेत.

या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता बाहेरील जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी तात्काळ आपल्या जिल्ह्यात जाणे सोईचे राहील.