Ahilyanagar News : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील दूध डेअरीच्या पैशांचा भरणा करण्यासाठी बँकेत जात असताना रस्त्यात कार आडवी लावून १७ लाख रुपये ठेवलेली असलेली बॅग पळविणाची नुकतीच घटना घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी या टोळीतील तिघांना अटक केली असता या घटनेमागे या डेरीत काम करत असलेला एक अल्पवयीन मुलगा असल्याचे समोर आले आहे.

सचिन राजेंद्र वायदंडे (वय २४, रा. सम्राटनगर, नागापूर), शुभम मनोज गुळसकर (२४, रा. बोल्हेगाव, एमआयडीसी), अभिषेक लक्ष्मण जाधव (२४, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) यासह एका अल्पवयीन मुलगा, अशा चारजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील गुळसकर हा सराईत गुन्हेगार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील मुळा अँग्रो प्रोडक्ट लि. ब्राम्हणी या कंपनीचे अनिल मुरलीधर बनसोडे हे बँकेत भरणा करण्यासाठी १७ लाख रूपयांची रोख रक्कम घेवून जात असताना अज्ञात चोरटयांनी मोटारसायकल आडवी लावत गज व टॉमीने कारच्या फोडून ही रक्कम लंपास केली होती.

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान याबाबतअनिल मुरलीधर बनसोडे यांनी राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरु करत घटनास्थळी भेट घेत सीसीटीव्ही तपासले. या गुन्ह्यात डेअरी काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले.

या गुन्ह्याबाबत त्याच्याकडे विचारपुस करता त्याने डेअरीमधील रोख रक्कम बँकेमध्ये कधी भरण्यासाठी जाते याबाबतची माहिती त्याचा मावसभाऊ अमोल शिंदे यास दिल्याची माहिती सांगितली.

त्यानुसार अमोल शिंदे याने त्याचे साथीदार सचिन वायदंडे, शुभम गुळसकर, अभिषेक जाधव, पप्पु कुसळकर, मोहन लष्करे यांनी लुटीचा कट तयार करुन मोहन लष्करे याने किया कंपनीची कार तसेच एका मोटारसायकलवर फिरून बनसोडे यांच्या गाडीवर पाळत ठेवली होती.

दरम्यान गाडी डेअरीमधुन निघाल्यापासुनची संपुर्ण माहिती कारमधील बसलेल्या आरोपींना या मुलाने दिली. त्यानंतर कारमधील व मोटारसायकलवरील आरोपींनी फिर्यादीची गाडी अडवुन, काडीच्या काचा फोडुन गाडीमधील रोख रक्कम असलेली बॅग घेवुन गेले असल्याचे सांगितले. पोलिस त्यांचा तीन दिवसांपासून शोध घेत होते.

आरोपी हे नागापूर एमआयडीसी परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी नागापूर परिसरात सापळा रचला. यातील तिघा आरोपींना एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तीन लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तिघा आरोपींना पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.