Ahilyamnagar News : गेल्या आठ दिवसांपासून गुलाबी थंडीचा जोर वाढू लागला आहे. थोड्या उशीराने का होईना पण थंडीचे आगमन झाल्याने नागरिकांत हुडहुडी भरली आहे. महाराष्ट्रात साधारणपणे दिवाळीनंतर थंडीला सुरुवात होऊन ती फेब्रुवारीपर्यंत असते, परंत यंदापावसाळा लांबल्याने अहिल्यानगर जिल्हयात थंडीला एक ते दीड महिना उशीर झाला आहे.

गेल्या आठ दिवसापासून थंडीची बोचरी चाहूल जाणवू लागली आहे. त्यामुळे काहीठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत तर रस्त्या वरील चहाच्या टपऱ्यांवर गर्दी वाढू लागली आहे. थंडीने अंगात हुडहुडी भरत असली तरी ती आरोग्याच्या दृष्टीने खुप फायदेशीर असते. या मोसमात मनुष्याला सर्दी सोडली तर इतर आरोग्य उत्तम राहते.

हिवाळ्याचा मोसम जसा चांगला तसा तो सृष्टीसाठीही खूप फायद्याचा असतो, वृक्षांना, प्राण्यांना व पिकांनाही थंडीचा कालावधी खूप लाभदायक असतो. याच कालावधीत पिकांची वाढ व फलधारणा जोरात होते.

साधारणपणे अजून एक तेदीड महिना थंडीचा जोर राहण्याची शक्यता आहे, परंतु चालू वर्षी पावसाळा जवळ जवळ दीड ते दोन महिने जास्त वाढला. या वर्षी पाऊस भरपूर झाल्याने थंडीचे प्रमाण जास्त राहून लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. थंडीबरोबर सकाळी धुकेही पसरत आहे.

रब्बी हंगामाला वाढलेल्या थंडीचा कडाका पिकांच्या पथ्यावर पडला असून गहू, हरभरा पिकांसाठी हे वातावरण पोषक ठरत आहे. परंतु थंडीचा जोर वाढल्याने शेताला पाणी देणारे शेतकरी, दुधवाले, कंपनी कामगार, शालेय विद्यार्थी यांची चांगलीच त्रेधात्रिपट उडत आहे. वीज मंडळ शेतीपंपासाठी रात्रीची वीज सोडून बळीराजाच्या अडचणीत भर घालत आहे.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात थंडीचा कडाका अधिक जाणवत असून गारव्या पासून बचाव करण्यासाठी नागरिकशेकोटी पेटवत आहेत. थंडीमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. शेतशिवारात पहाटे धुके दाटत असल्याने पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सायंकाळनंतर थंडीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. सकाळ-संध्याकाळी कानटोप्या, मफलर, स्वेटर घालूनच लोक घराबाहेर पडत आहेत. दिवसाही थंडी जाणवत असून बदलत्या वातावरणामुळे आशा परिस्थितीचा अनुभव येत आहे.