Ahilyanagar News : यंदा शेतकऱ्यांची रब्बी हंगाम हरभरा, गहू पेरणी वेळेत झाली आहे. परंतु दरम्यानच्या काळात हवामान बदल झाल्याने गहू, हरभरा आदी रब्बी पिकासोबतच डाळिंब, द्राक्ष, पेरूच्या बागांवर देखील रोगराई पसरली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून पुन्हा हवामान पूर्ववत झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.
चालू वर्षी पाऊसकाळ चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शिवाराची वेळीच मशागत करून रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मका आदी पिकांची लागवड केली आहे. हवामानाचा अंदाज घेवून योग्य वेळी पेरणी झाल्याने उगवण चांगली झाली होती.
त्यानंतर मागील १० ते १२ दिवसात अचानक थंडी गायब झाल्याने गहू, हरभरा पिकांसह द्राक्ष, डाळिंब व पेरुंच्या बागेवर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. मागील दोन दिवसात पुन्हा हवामान पूर्व पदावर येत असून थंडीचा जोर वाढू लागला आहे.
त्यामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिकांना उभारी मिळाली असून यंदा ज्वारी, गहू, मका, हरभरा ही पिके शेतकऱ्यांना लाभदायी ठरतील, अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
राज्यात शुक्रवारपासून (१३ डिसेंबर) थंडीची लाट तीव्र होत जाणार असून ती १८ डिसेंबरपर्यंत राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान गुरुवारी विदर्भ आणि मराठवाडा गारठण्यास सुरुवात झाली असून विदर्भाचा पारा गुरुवारी १० अंशांखाली गेला होता. तर अहिल्यानगरचे तापमान ११.५,अंश सेल्सिअस होते.
सध्या काश्मीरपासून मध्य प्रदेशपर्यंतचा भाग गुरुवारपासून गारठून गेला. राजस्थानातील सिकर येथे गुरुवारी एक अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. हंगामातील हे सर्वात कमी तापमान ठरले.
त्या भागातून राज्यात शीतलहरी येत आहेत. त्याची सुरुवात विदर्भापासून झाली आहे. त्यामुळे १३ ते १८ डिसेंबरपर्यंत किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.