Home अहिल्यानगर राज्यात सध्या ऊन सावलीचा खेळ ; शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज : ...

राज्यात सध्या ऊन सावलीचा खेळ ; शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज : हवामान तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

Ahilyanagar News :सध्या जिल्ह्यात काही भागात चांगला पाऊस पडत आहे तर काही भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. तर दुसरीकडे राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ६ ते ७ अंशांनी जास्त आहे. हिंदी महासागरावरील विषुववृत्तीय परिक्षेत्रात उष्णता वाढली आहे. त्यामुळे २५ ऑगस्टपर्यंत राज्यात कमाल व किमान तापमानात वाढ राहणार आहे. राज्यातील २५ ते २८ जिल्ह्यांत दुपारचे तापमान ३२ ते ३४ अंशांवर जाईल.

त्यामुळे अचानक वाढलेल्या तापमानाचा फटका आत्तापर्यंतच्या चांगल्या स्थितीतील पिकांना बसू शकतो. तसेचकाही पिकांना किडीचा प्रादुर्भाव देखील होऊ शकतो. होत असलेलया या प्रचंड उकाड्यामुळे तयार झालेल्या उष्णतेमुळे राज्याच्या काही भागात २० ऑगस्टदरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सध्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे तर काही भागात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आताच पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मान्सूनची गती चांगलीच मंद झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच ऑक्टोबर हिट जाणवत आहे.

राज्याच्या कमाल तापमानात तब्बल ८ ते १० तर किमान तापमानात ४ ते ६ अंशांनी वाढ झाल्याने प्रचंड उकडा जाणवत आहे. ही स्थिती २५ ऑगस्टपर्यंत जाणवणार आहे. त्यामुळे या काळात पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

दरम्यान, अहिल्यानगरसह पुणे, मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा या आठ जिल्ह्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार आहे. देशात तुरळक भागातच पाऊस सुरू आहे. त्यामुळे देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३७ अंशांवर गेलाआहे, तर महाराष्ट्राचा पारा ३२ ते ३४ अंशांवर गेल्याने ऑगस्टमध्येच ऑक्टोबर हीट जाणवत आहे.

अशा वेळी पिकांना पाण्याची पाळी द्यावी लागेल, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. विशेषतः संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यातील तापमान हे सरासरीच्या ५ ते ६ डिग्रीने अधिक जाणवणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे देखील आवाहन करण्यात आले आहे.