Ahilyanagar News : अंगणवाडीतील बालक तसेच गरोदर व स्तनदा मातांसाठी शासनाकडून बंद पाकिटात पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. यामुळे बालकांचे पोषण होत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र या आहाराने मुलांचे तर पोषण होत नाही मात्र ठेकेदाराचे मात्र निश्चित होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

संगमनेर तालुक्यातील जांबुत खुर्द मधील गावठाणातील क्रमांक १ या अंगणवाडीतील शालेय पोषण आहारामध्ये गुठळ्या, बुरशी लागल्याचे आढळून आले. यावेळी पोषण आहाराचे पाकिट बघितले असता त्यांची मुदत संपली होती. तसेच काही पाकिटांवर तारखा देखील नव्हत्या.

६ ते ३ वर्षांवरील बालकांसाठी हि घटना शुक्रवार दि.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले होते. या आहाराचा पंचनामा करून थेट पुरवठदारावरच कारवाईची मागणी केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, जांबुत खुर्द येथील गावठाणात क्रमांक एकची अंगणवाडी आहे. तसेच या अंगणवाडीतील ६ ते ३ वर्षाखालील बालक तसेच गरोदर व स्तनदा मातांसाठी शासनाकडून बंद पाकिटात पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो.

सदर पोषण आहार खासगी ठेकेदाराकडून अंगणवाडीसाठी पुरवठा केला जात आहे. मात्र जांबुत खुर्द येथील गावठाणातील या अंगणवाडीत पुरवठा करण्यात आलेला पोषण आहार अक्षरशः निकृष्ट दर्जाचा आढळून आला आहे.

याबाबतची माहिती उपसरपंच सुभाष डोंगरे यांना कळताच त्यांनी थेट अंगणवाडीत धाव घेतली. तसेच पोषण आहाराचे पाकिट तोडून बघितले तर त्यात गिठळ्या, बुरशी लागल्याचे आढळून आले. यावेळी पोषण आहाराचे पाकिट बघितले असता त्यांची मुदतीची तारीख देखील संपलेल्या होत्या. तसेच काही पाकिटांवर तारखा देखील नव्हत्या.

याबाबतची माहिती तातडीने उपसरपंच डोंगरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे कळविली. त्यानंतर प्रभारी प्रकल्पाधिकारी कल्पना अंधूरे, सुपरवायझर मिना गोरखा यांनी तातडीने या अंगणवाडीत धाव घेतली. यावेळी त्यांनी आहाराची पाहणी केली.

त्यानंतर अंगणवाडी सेविका, मदतनिस, महिला, ग्रामस्थांसमक्ष सदर निकृष्ट दर्जाचा आहाराचापंचनामा केला. त्याचबरोबर पोषण आहारातील काही नमुने तपासणीसाठी नगर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी प्रकल्पधिकारी कल्पना अंधूरे यांनी दिली आहे.

दरम्यान अंगणवाडीसाठी शासनाच्यावतीने खासगी ठेकेदाराकडून पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार घडत असून याकडे कुणीही लक्ष दिले नाही.

त्यामुळे बालकांसह स्तनदा गरोदर मातांच्या जीवाशी खेळलेला हा संतापजनक प्रकार आहे. त्यामुळे संबंधित पुरवठादारावर कारवाई करत सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.