Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील गणेश कारखान्याच्या बॉयलर मधून निघणाऱ्या काजळीने नागरिकांना मोठ्या प्रमाणात श्वासाचे विकार होत असून, काजळीच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. कारखाना प्रशासनाने यावर तात्काळ उपाय करून नागरिकांना होणाऱ्या आरोग्य समस्या तात्काळ दूर कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत घोरपडे म्हणाले सध्या ऊस हंगाम सुरू झाल्याने गणेश सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर मधून निघणाऱ्या काजळीने या परिसरात राहणाऱ्या एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरिकांना या प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास सुरू झाला आहे.

मागील वर्षी हा त्रास नागरिकांना जाणवत नव्हता व जिल्ह्यातील इतर ठिकाणी असणाऱ्या कारखाना परिसरात देखील नागरिकांना हा त्रास जाणवत नाही परंतू यावर्षी गणेश कारखाना प्रशासनाने योग्य प्रकारे मशनरीचे मेंटेनन्स न केल्यामुळे यावर्षी कारखाना सुरू झाल्यापासून बॉयलर मधून निघणाऱ्या काजळीने नागरिकांना श्वासाचा त्रास जाणू लागला आहे.

तसेच दमा असणाऱ्या रुग्णांना व लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना देखील या काजळीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. एक ते दोन किलोमीटर परिसरातील राहणाऱ्या नागरिकांच्या घरात या बॉयलरच्या प्रदूषणामुळे तसेच घराबाहेर मोठ्या प्रमाणात काजळीचे थर साचून राहत असल्यामुळे घरातील महिलांना घर स्वच्छ करण्यासाठी मोठी डोकेदुखी झाली आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती पिके आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. पशुधनास पाणी पिण्यासाठी शेतकरी बांधवांनी पाण्याचे हौद बांधले आहे.

त्या पाण्यात काजळी पडून पाणी दूषित होत असल्याने परिणामी पशुधन ते पाणी पीत नाही तसेच शेतीमालावर देखील या काजळीचा मोठा परिणाम बघायला मिळत आहे.

फळ भाजीपाला तसेच जनावरांचा चारा यावर काजळी पडून फळ भाजीपाला तसेच जनावरांचा चारा खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. घरासमोर कपडे धुऊन वाळवणीवर टाकल्यानंतर काही वेळातच काजळीने ते काळे होतात.

घरात किंवा घराबाहेर विना चप्पल पायी चालल्यावर तळपायाला काजळी चिटकून पाय काळे पडतात आशा अनेक समस्या नागरिकांना या बॉयलरच्या काजळीतून होत असून या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्यधोक्यात आले आहे.

याबाबत आपण दिल्ली येथील प्रदूषण नियंत्रण कक्षाला नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली आहे. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांनी तात्काळ कारखान्यातील मशिनरीचे मेंटेनन्स करून बॉयलर मधून बाहेर पडणारी काजळी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.

नागरिकांच्या प्रदूषणापासून होणाऱ्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना न केल्यास या परिसरातील नागरिक कारखाना कार्यस्थळावर उपोषणास बसणार असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.