Ahilyanagar News : पीक विमा, शेतकरी सन्मान योजना, मुख्यमंत्री लाडके बहीण या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला योजनेच्या माध्यमातून पैसे मिळाले, या योजना निवडणूकी पुरत्या नसून पुढील काळात बंद पडणार नाही. असा विश्वास राज्यातील व देशातील जनतेला आहे आणि या विश्वासाच्या जोरावर जनतेने सरकारला पुन्हा निवडून दिले आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही लोकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून मोठ्या दिमाखात बोर्ड लावले होते. संगमनेर व नेवासा तालुक्यातील देखील काहींनी भावी मंत्री म्हणून बोर्ड लावले होते. परंतु जनतेने या सर्वांची स्वप्न धुळीस मिळवले अशी टीका बाळासाहेब थोरात व गडाख यांचे नाव न घेता टोले लगावले.
सभापती राम शिंदे भाषणात म्हणाले, थोरात म्हणजे मोठे प्रस्थ त्यांच्या समोर उमेदवार फक्त नावापुरते उभे राहायचे. मात्र यावेळी तिथे मोठी क्रांती झाली अन मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणाऱ्याला अमोल खताळ यांनी विखे पाटलांच्या आशीर्वादाने घरी पाठवले.
अशी कोपरखळी थोरात यांना मारत विखे पाटील म्हणजे चिरकाल नेतृत्व, त्यांची आता आठवी टर्म आहे. तर पुढच्या वेळी आपल्या सर्वांना आठवून त्यांना नवव्यांदा निवडून आणायच आहे . पुढच्या वेळी ते विधानसभेतील सर्वात जेष्ठ आमदार असतील अशी स्तुतीसुमने देखील त्यांनी विखे यांच्यावर उधळली.
नेवासा येथे जिल्हयातील महायुतीच्या नामदार व आमदारांचा सन्मान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व महायुतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. या सन्मान सोहळ्याला विधानसभेचे सभापती प्रा.राम शिंदे व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे आमदार उपस्थित होते. याच सन्मान सोहळ्यात विखे व राम शिंदे यांनी थोरात यांच्यासह गडाख यांना चांगलेच चिमटे काढले.
बोलताना विखे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील नेते राम शिंदे हे आपल्या सुदैवाने विधानपरिषदेचे सभापती झाले आहेत. त्यांच्यामुळे जिल्ह्याचा बहुमान वाढला. आम्ही मंत्री असलो तरी मंत्र्यांना आदेश देण्याचा अधिकार सभापतींना असतो. मंत्र्यांना आदेश देण्याचे भाग्य आपल्या जिल्ह्याला मिळाले. आपल्या सर्वांना राम शिंदेंचे कौतुक आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यात विकासाची कामे करताना मोठी मदत होणार आहे.
ज्ञानेश्वर मंदिराचा आराखडा इतका उत्कृष्ट असेल की इथे राज्यात नव्हे देशात नाव निघेल, राज्यात प्रबंड बहुमताने आलेले सरकार ही लाट नसून लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे. हे सरकार आश्वासन देणारे नसून काम करणारे सरकार आहे. देशात किंवा राज्यात असा एकही शेतकरी नसेल किंवा असे काही कुटुंबन असेल की त्या व्यक्तीला सरकारचा फायदा झाला नसेल. या कार्यक्रमास तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.