Ahilyanagar News : राज्यातील महायुती सरकारच्या शपथविधीनंतर आत सगळ्यांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये काही मंत्रिपदांच्या तिढ्यामुळे विस्तार रखडला होता.
त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी रात्री नवी दिल्ली गाठून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खलबते केली.
मात्र, या खलबतांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गेले होते.
या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीअंती शिवसेनेला नगरविकास खाते मिळण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून त्यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे करुन दिले.
यावेळी मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांबाबत चर्चा झाल्याचे समजते. विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन संपल्यावर आता सगळ्यांना मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता लागली आहे. महायुतीतील आमदारांच्या मनात मंत्रिपदावरुन धाकधूक वाढली आहे. मंत्रिपदांबाबत गुप्तता पाळली जात असल्याने आमदारांचं टेन्शन वाढले आहे.
एकीकडे शिवसेनेचे मंत्री टेन्शनमध्ये असताना दुसरीकडे भाजपच्या आमदारांची अवस्थाही वेगळी नाही. दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. काही खात्यांबाबत महायुतीत समन्वय होत नसल्याने भाजपचीही यादी लटकल्याचे सांगितले जात आहे.
दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती. पुढच्या ४८ तासात तरी दिल्लीत काही हालचाली घडणार की, आणखी वेळ लागणार याकडे संभाव्य मंत्र्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याने भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांचेही टेन्शन वाढले आहे.
तर महायुती सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदांचा विचार करता, पुन्हा जुन्या चेहऱ्यांना संधी देण्याऐवजी नव्या चेहऱ्यांचा समावेश करावा, अशी चर्चा शिवसेना आमदारांमध्ये आहे.