Ahilyanagar News : भारतीय समाजात लग्नाला अत्यंत पवित्र मानले जाते. हिंदू धर्मात, विवाहाला १६ संस्कारांपैकी एक महत्त्वपूर्ण संस्कार मानले जाते. विवाहाच्या विधींमध्ये अग्नि, मंत्रोच्चार, आणि देवी-देवतांच्या आशीर्वादांचा समावेश असतो.

मागील काही वर्षात लग्नसमारंभात खूप बदल झाला आहे. पळस, जांभूळ, करंजी झाडांच्या डहाळ्यांच्या हिरव्या मंडपात जेवणाची पंगत, आंदणात येणारी भांडी जवळजवळ कालबाह्य झाली आहे.

आज बहुतांश लग्नसमारंभ हे मंगल कार्यालयात संपन्न होतात. या समारंभाला इव्हेंटचे स्वरूप आले असून फोटोग्राफीचा अतिरेक तर नको इतका असतो.

ग्रामीण भागातील अनेक लोक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या मंगल कार्यालयातच लग्न उरकवितात. एकंदरीत या समारंभाला व्यावसायिक दृष्टीने महत्त्व आले आहे. आज प्रत्येक गोष्ट पैसे देऊन केली जाते.

पूर्वीच्या काळी लग्नसमारंभ कमी वेळेत, कमी खर्चात आणि योग्य ते पावित्र्य राखून पार पडले जात. आता अलीकडील काळात लग्नसमारंभाच्या भपकेबाजपणा जास्त प्रमाणात वाढत आहे.

पूर्वीच्या काळी लग्नसमारंभाची तयारी काही महिन्यांपासून केली जायची. प्रत्यक्ष समारंभ काही दिवस चालायचा. पै-पाहुण्यांचा राबता अनेक दिवस असायचा. लग्नघर किमान महिनाभर तरी पाहुण्यांनी गजबजलेले असायचे. आता ते शक्य नाही आणि ते स्वाभाविकही आहे.

सध्याच्या काळात महागडे सुसज्ज हॉल, कॅटर्स, डोली, बॅण्ड, दिव्याची रोशणाई व विविध खाद्यपदार्थांवर मोठा खर्च केला जातो. लग्न कार्यालयात सर्वांचे लक्ष वेधून घेणारे मुख्य घटक म्हणजे लग्नात असलेला फोटोग्राफर हा होय.

अनेक लग्नसमारंभातडझनभर तरी फोटोग्राफर असतात. विविध अँगलने फोटो काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. वर, वधूसोबत फोटो काढणे ही जणूकाही फॅशन झाली आहे. त्यामुळे बराचसा वेळ हा फोटो काढण्यात जातो.

साधारणतः एक लाखापर्यंत हा खर्च होत असला, तरी मात्र अनेक तरुणांचे ते एक रोजगाराचे साधन बनले आहे. ही बाब नाकारून चालणार नाही; परंतु या फोटोचा होत असलेला अतिरेक थांबविणे पण तितकेच आवश्यक आहे. ज्यामुळे वेळ वाचेल आणि पैसा देखील !