Ahilyanagar News : केंद्र आणि राज्य सरकार हे सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून योजना राबवत आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ १ कोटी ६० लाख महिलांना मिळालेला आहे.

यामुळे राज्यातील महिलांच्या चेहऱ्यावर वेगळे समाधान आहे. मात्र हे समाधान पाहवत नसल्याने काहीजण हे योजनेच्या विरोधात भूमिका घेत असून कोर्टात जाऊन योजना बंद पाडण्याचे पाप करीत आहेत. असे सांगत बहीण-भावाच्या नात्यात आडवे याल तर खबरदार अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना ठणकावले आहे.

महिला सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत बुधवारी येथे आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजनांचे लाभार्थी संबंध आणि संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजनांबाबत जनतेला दिलासा देत विरोधकांवर टीकास्त्र सोडले. राज्यातील बहिणींनी मोठे प्रेम दिले आहे. योजनेच्या लाभानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान तर आहेच, पण योजनेमुळे कुटुंबाला मोठा आधार मिळणार आहे.

सर्वकाही योग्य होत असताना विरोधकांना सर्वसामान्य नागरिकांचे चांगले झालेले पाहवत नाही. त्यामुळे विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

युवा कार्य प्रशिक्षण, तीर्थक्षेत्र योजना, मुलींना मोफत शिक्षण या योजना यशस्वीरीत्या राबवल्या जात असताना काँग्रेसच्या नेत्याने न्यायालयात याचिका दाखल केली, हे दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.तसेच या चांगल्या योजणांच्या आडवे येणाऱ्या विरोधकांना त्यांनी चांगलेच खडसावले आहे.