Ahilyanagar news : वाढती थंडी कांदा आणि गहू पिकाला पोषक जरी असली, तरी द्राक्ष बागायतदारांमध्ये या थंडीमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने त्याचा परिणाम द्राक्षबागांच्या द्राक्षबागांच्या फुगवणीवर व द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती निर्माण होत असल्याने असे द्राक्ष निर्यातक्षम होण्यास पात्र ठरत नाही.
परिणामी, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. परत एकदा पारा घसरल्याने राज्यालाच हुडहुडी भरली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याच्या भीतीने द्राक्षबागा असलेले शेतकरी बागांमध्ये शेकोट्या पेटवून ऊब निर्माण करीत आहेत.
वायव्य भारतात समुद्रसपाटीपासून दीड किमी उंचीपर्यंत मध्यप्रदेशातील विदिशाच्या आसपास केंद्रबिंदू स्थित, घडाळाच्या काट्याच्या दिशेने प्रत्यावर्ती चक्रीय थंड वाऱ्यामुळे उत्तर भारतातील थंडी महाराष्ट्रात पूर्व दिशेने फेकली जात आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट, तर काही ठिकाणी लाटसदृश स्थिती जाणवत आहे. सध्या जाणवत असलेली अपेक्षित थंडी संकष्टी चतुर्थीपर्यंत टिकून राहण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
तर दुसरीकडे वाढत्या थंडीमुळे द्राक्षांची फुगवण थांबली असून, वेलींच्या पांढऱ्या मुळ्यांचे कार्य कमी पडले आहे. झाडांमध्ये लवचिकपणा कमी होऊन कडकपणा दिसू लागल्यामुळे विभाजनाची प्रक्रिया थांबली आहे.
बागेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे मणी तडकण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी सकाळच्या वेळी बागेत शेकोट्या पेटवून धूर करताना दिसत आहेत. तसेच, पहाटे बागेला ड्रिपद्वारे पाणी दिले जात आहे.
हातातोंडाशी आलेले द्राक्षपीक वाचविण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करीत आहेत. त्यात प्रामुख्याने बागेच्या बाजूने साड्या लावून द्राक्षांचे संरक्षण केले जात आहे.
गेल्या आठवड्याभरापासून राज्यभरात थंडीची लाट आली आहे. सोमवारी अहिल्यानगर शहराचे किमान तापमान ५.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. तापमानात अजून घट होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांनी गरम कपडे वापराला पसंती दिली आहे. सोमवारी दिवसभर देखील थंडी जाणवत होती. सायंकाळी त्यात वाढ झाल्याने रस्त्यांवर लवकरच शुकशुकाट दिसून आला.