Ahilyanagar News : तापमानाचा पारा चांगलाच खाली घसरत आहे. यामुळे राज्यात थंडी वाढली आहे. उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. जिल्ह्यातही कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील वाढत्या शीत लहरींमुळे राज्यात पुढील काही दिवस कडाक्याची थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

यातून स्वतःचा व कुटुंबातील सदस्यांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. थंडीची लाट किंवा शीत लहर ही हवामानीय घटना आहे. यामुळे तापमान सरासरीपेक्षा खूप कमी होते.

उच्च वेगाच्या थंड वाऱ्यांचा अनुभव येतो, ज्यामुळे हवामान प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा जास्त थंड वाटते. हे काही दिवसांपर्यंत टिकू शकते, ज्यामुळे मानवी जीवन, शेती, पशुधन, वन्यजीव प्रभावित होण्याची शक्यता असते.

वाढत्या शीत लहरींमुळे शरीराच्या तापमानावर परिणाम होतो, ज्यामुळे शारीरिक समस्या उद्भवू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने अति जोखीम असलेल्या गरोदर महिला, लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, श्वसनाच्या आजारांच्या व्यक्ती यांच्या आरोग्याची काळजी गरजेची आहे.

या काळात पुरेसे थंडीचे कपडे बाळगावेत, एकावर एक असे अनेक कपडे घालणेही उपयुक्त, कोरडे राहा, ओले असल्यास पटकन कपडे बदला, ज्याद्वारे शरीरातील उष्णता कमी होणार नाही.

हातमोज्यांपेक्षा पूर्ण हात सलगपणे झाकला जाईल असे मोजे घ्या, त्याने जास्त गरम वाटून थंडीपासून बचाव होतो. लाट असताना शक्यतो घरातच थांबा, थंड वाऱ्यापासून बचावासाठी किमान प्रवास करा. वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घ्या.

थंडीमुळे कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या उद्भवल्यास नजीकच्या शासकीय दवाखान्यात जाऊन तपासणी करा. अशा प्रकारे, वाढत्या थंडीत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी आपली व कुटुंबीयांची काळजी घ्यावी.