Ahilyanagar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या तसेच श्रीगोंदा तालुक्यात मोठे राजकीय वलय असलेल्या बाळासाहेब नाहाटा यांचा मुलगा मितेश नाहाटा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मितेश नाहाटा यांना साखर गैरव्यवहार प्रकरणात इंदौरच्या पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे नाहाटा यांना या पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. तसे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी काढले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मितेश बाळासाहेब नाहाटा श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी आहेत. पुणे येथील एक जणासमवेत मितेश नाहाटा यांनी इंदौरमधील एका व्यापाऱ्याला साखर देण्याच्या बदल्यात कोट्यवधीचा गंडा घातल्याची फिर्याद इंदौर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

या प्रकरणी तेथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मितेश नाहाटा यांना ताब्यात घेतले आहे. ही माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मितेश नाहाटा यांना पदावरून बडतर्फ केले आहे.

या प्रकरणातील फिर्यादीत सांगण्यात आलेला दुसरा आरोपी हा देखील श्रीगोंदा तालुक्यातीलच एका ज्येष्ठ दिवंगत नेत्याचा मुलगा असल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

इंदौर पोलिसांच्या कारवाईच्या बातम्या सध्या श्रीगोंदा तालुक्यात सोशल मीडियावरून फिरत आहेत. दरम्यान बाळासाहेब नाहाटा हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र आता त्यांच्या मुलाला आर्थिक गैरव्यवहारात ताब्यात घेण्यात आल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चाना उधाण आले आहे.