Ahilyanagar News : असे म्हणतात ना प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गेले. म्हणजे, माणसाने एखादी गोष्ट करायचीच असं ठरवलं तर तो काहीही साध्य करू शकतो, असा याचा अर्थ होतो.
या म्हणीला साजेशे असेच कष्ट घेत एका भूमिहीन मजुराच्या मुलाने जिद्दीच्या, मेहनतीच्या जोरावर त्याने भारतीय सैन्यदलात भरती होत दोन पिढ्यांच्या कष्टाचे चीज केले आहे. त्याच्या या यशामुळे ग्रामस्थांनी त्याची भव्य मिरवणूक काढून त्याचे स्वागत केले.
हि कहाणी आहे शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील गोपाल अशोक वाकडे या तरुणाची. शेती नसल्याने वाकडे याच्या आजोबांनी आयुष्यभर मोलमजुरी करून कुटुंब चालवले. त्यांच्या नंतर आई- वडिलांच्याही नशिबात आजपर्यंत काबाडकष्टच आले. मात्र, आपण काहीतरी करून ही परिस्थिती बदलू अशी मनाशी खुनगाठ बांधून आपले प्रयत्न सुरूच ठेवले.
मध्यमवर्गीय कामगार कुटुंब असणाऱ्या गोपाल वाकडे याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. दहावीपर्यंत शहरटाकळी विद्यालयात शिक्षण घेऊन बारावीचे शिक्षण त्याने नवजीवन विद्यालयातून पूर्ण केले. मात्र वडिलांना असलेली नियमित व्यायामाची सवय गोपालनेही अंगी बाणली.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने मोठ्या सरकारी नोकरीची अपेक्षा न ठेवता भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्या उद्देशाने मिरजगाव येथील सैन्यदलाचे प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीत प्रवेश घेतला. आई- वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत त्याने जिद्दीने अभ्यास आणि सराव केला. मेहनतीला यश आले आणि त्याची इंडियन आर्मीत निवड झाली.
गोपालचे आजोबा सखाराम, आई नंदा आणि वडील अशोकराव यांनी आपल्या प्रपंचासाठी नेहमीच कष्टाचे काम केले. भूमिहीन असूनही ते कधी निराश होताना दिसले नाही. अशातच गोपालने मिळविलेल्या यशाने त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याच्या भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.