Ahilyanagar News : मोह माणसाला काहीही करण्यास भाग पडतो, यात अनेकदा मोठा फटका देखील सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकदा मोह करणे वाईटच असे सांगितले जाते ते यासाठीच. नुकतीच अशी घटना समोर आली आहे ज्यात १० रुपयांच्या मोहापायी मोठी रक्कम गमवावी लागली आहे.

शिर्डीत आलेल्या साईभक्तांना चोरी गेलेले मोबाईल सहसा सापडत नाही हा अनुभव असला तरी काही साईभक्त साईदर्शनासाठी जाताना आपल्या वाहनचालकाला सांगून मोबाईलची पर्स गाडीत ठेवून निघून जातात. कधी काचा फोडून तर कधी दरवाजा उघडून मोबाईल घेऊन पळून जाणारे चोरटे यापूर्वी शिर्डीत गुन्हा करताना दिसून आले होते.

आता मात्र मोबाईल चोरट्याने चोरी करताना नवीनच फंडा अवलंबल्यामुळे परराज्यातून आलेल्या साईभक्तांच्या कुटुंबातील सदस्यांचे ७९ हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल चार हजार रोख व एटीएम क्रेडिट व डेबिट कार्ड चोरून नेण्याची घटना २८ डिसेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास नगर मनमाड रोडवर घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की राजेश कुमार सिंग (वय ३९, राहणार मनियारी, तालुका सैदपूर, जिल्हा गाझीपथ उत्तर प्रदेश, सध्या राहणार ठाणे) हा विजय रॉय कुटुंबाला चारचाकीतून (एम. एच.४३ बी. एन. १०००) क्रेस्टा या गाडीत प्रवास करत नाशिक येथील विविध ठिकाणी दर्शन करून शिर्डी येथे आले होते. अकरा वाजेच्या सुमारास नगर-मनमाड रोडवर साईभक्त चालकाला सोडून दर्शनासाठी गेले होते.

वाहतूक पोलीसांनी वाहन रोडवर लावू नका अशा सूचना दोन वेळा दिल्या होत्या. परंतु परतु त्या चालकाने या सूचनेकडे लक्ष दिले नाही. गाडी रोडवर उभी केली होती. चालकाच्या पाठीमागील सिटवर मोबाईलची बॅग ठेवून साईभक्त दर्शनासाठी गेले होते. चालक दरवाजा बंद करून गाडीत बसलेला असताना त्याला गाडीच्या जवळ दहा रुपयांच्या काही नोटा पडलेल्या दिसल्या.

त्या नोटा उचलण्याचा मोह या चालकाला झाला. नोटा गोळा करत असताना गाडीचा दुसरा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने पर्स मधील ७९ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल घेऊन अज्ञात छोटा पसार झाला. साईभक्त साई दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांनी चालकाला त्याच्या मोबाईलवर फोन करून आमचे सर्वांचे मोबाईल घेऊन हॉटेल जवळ नाश्ता करण्यासाठी ये, असे सांगितले असता त्याने मोबाईल चोरी गेले असे सांगितले.

त्यानंतर या साईभक्तांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये येऊन घडलेला प्रकार सांगितला. चालक राजेश कुमार सिंग यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत.