Ahilyanagar News : आजमितीला शेती करणे म्हणजेच तोट्याचे झाले आहे. जो शेती घरच्या घरी करतो, त्याला मोलमजुरी पडते. शेती आता तोट्याचा व्यवसाय आहे.

शेतकऱ्यांना शेतीमध्ये मोलमजुरीच पडत असून, कधी कधी तोटाही सहन करावा लागत आहे. त्यातच शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने पिकावर खर्च जास्त आणी उत्पन्न मात्र कमी अशी गत झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामातील सोयाबीनचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्या तुलनेत सोयाबीनचे बाजारातील दर वाढणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही.

त्यामुळे खर्च जास्त आणी उत्पन्न कमी अशी गत झाल्यामुळे सोयाबीन पिक शेतकऱ्यांना परवडले नाही, आता शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाला देखील उतारा कमी आला.

त्यातच कापसालाही खूपच कमी दर मिळत असल्याने कापसाची दरवाढ व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. सध्या तुरीचे पीक जोमात बहरलेले असून, तुरीच्या पिकातून तरी हाती काही पडेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. सुरुवातीच्या काळात सोयाबीन पिक जोमात बहरलेले असतांना सततच्या पावसामुळे पिकाची मर्यादेपेक्षा अधिक वाढ झाल्याने अपेक्षेप्रमाणे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही.

त्यातच खासगी बाजारपेठेत सोयाबीनला चार हजार रुपयांपर्यंत अल्प दर मिळाल्याने सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडले नाही. सोयाबीन सोबत शेतकरी खरीप हंगामात नगदी पीक म्हणून कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

मात्र, दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाला उतारा कमी आणि दरही तोकडा मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कापसाच्या उत्पादनापेक्षा खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांना सात हजार इतक्या अल्प दरात कापूस विकणे परवडत नाही.

शिवाय वेचणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले असून प्रति किलो १२ रुपये वेचणीला खर्च येत असल्याने शेतकऱ्यांनी कापसावर केलेला उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तुरीला तरी चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.