Ahilyanagar News : सध्या राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून, शनिवारी किमान तापमान जळगाव येथे ८.४ अंश सेल्सिअस तर अहिल्यानगर मध्ये ८.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. या हंगामातील हे सर्वात कमी तापमान असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर तीन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील हवामान कोरडे आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव राज्याच्या वातावरणावर झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात थंडीत वाढ झाली आहे. अनेक भागांतील तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. तसेच कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे.

शनिवारी राज्यात कमाल तापमान रत्नागिरी येथे ३४.८ अंश सेल्सिअस होते. शनिवारी विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय तर मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.

उत्तरेकडील थंडीच्या वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यात दोन दिवस गारठा कायम राहणार असला, तरी किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वाढलेला गारठा रब्बीतील गहू, हरभरा आदींसह इतर पिकांना लाभदायकी असला तरी कडाक्याच्या थंडीने कांद्याला अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये): मुंबई (कुलाबा) २१.६, सांताक्रुझ २०.१, रत्नागिरी २०.६, डहाणू १६, पुणे १०.१, लोहगाव १३.३, अहिल्यानगर ८.७, जळगाव ८.४, कोल्हापूर१७, महाबळेश्वर ११.७, मालेगाव १०, नाशिक ९.२, सांगली १५.५, सोलापूर १५.४, धाराशीव १३.२, छत्रपती संभाजीनगर ९.८, परभणी ९.८, नदिड ११.५, बीड ११.५, अकोला १०.६, अमरावती १२.३, बुलढाणा १०.६, ब्रह्मपुरी १०.६, चंद्रपूर ११, गोंदिया ८.८, नागपूर ९.४, वाशिम ११.२, वर्धा ८.९.