Ahilyanagar News : राज्यात थंडीचा कडाका वाढत असून, मंगळवारी सर्वात कमी तापमान अहिल्यानगर येथे ११.६ अंश सेल्सिअस इतके होते. दरम्यान, पुढील सहा दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असून, किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
आकाश निरभ्र असून, हवामान कोरडे आहे. तसेच उत्तरेकडून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत, त्यामुळे राज्यात थंडी वाढत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात कमाल व किमान तापमानात घट होत आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान रत्नागिरी येथे ३५ अंश सेल्सिअस इतके होते.
येत्या २० ते २५ नोव्हेंबरदरम्यान, राज्यातील हवामान कोरडे राहणार असून, थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून कळवण्यात आले आहे. विदर्भातकाही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर कमालीचा वाढला आहे. त्यामुळे शहरात शेकोट्यासमोर बसलेले नागरिक दिसून येत आहे. ग्रामीण भागात घरासमोर व शेतात शेकोट्या पेटू लागल्या आहे. थंडीपासून बचाव करण्याकरिता नागरिकांनी उलन कपड्याचा वापर करणे सुरू केले.
दिवसभर थंडी जाणवत लागल्याने शहरातील रस्त्यांवर स्वेटर, जॉकेट आदी गरम कपडे परिधान केलेले नागरिक दिसून येत आहे. मॉर्निंग वॉकसाठी निघर्णाया नागरिकांची संख्याही या थंडीच्या कडाक्याने रोडावली आहे.
राज्यात सकाळी थंडी दुपारी उष्णता आणि रात्री पुन्हा थंडी असं वातावरण दिसून येतंय. आजपासून थंडीचा कडाका आणखी वाढणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी आता शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे.
पुढील २४ तासांमध्ये धुक्याचं प्रमाण वाढणार असून, थंडीचा कडाकाही वाढणार आहे. येत्या काळात राज्यात गारठा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रात तापमानात मोठी घट झाल्याची दिसून येत आहे. येथे किमान तापमानाचा आकडा १५ अंशांवर आला आहे. सकाळी आणि रात्री गारठा वाढला आहे, तर दुपारी उष्णता वाढल्याने उकड्यामुळे नागरिक हैराण होत आहेत. थंडीचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
यावर्षी राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस सुरु झाला होता. यावर्षी राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. आता पाऊस राज्यातून पूर्णपणे नाहीसा झाला आहे. त्यामुळे थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई-२३.६, सांताक्रुझ-१९, रत्नागिरी-२०.६, डहाणू-१९.५, पुणे-१२.९, लोहगाव-१५.१, जळगाव-१३.८, कोल्हापूर- १७.३, महाबळेश्वर-१३.८, माळेगाव-१५.०, नाशिक-१२.७, सांगली-१६, सातारा-१४.७, सोलापूर-१६.८, धाराशीव-१५.४, छत्रपती संभाजीनगर-१४.४, परभणी-१४.६, अकोला- १५.४, अमरावती-१४.६, बुलढाणा-१५.४, ब्रह्मपुरी-१४.२, चंद्रपूर-१४.६, गोंदिया-१३.२, नागपूर-१३.५, वर्धा-१४.९