Ahilyanagar News : हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासह आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. पर्यायाने अनेकजण शेती करणे नको या भावनेतुन शेती विक्री करतात तसेच अनेकजण पडीक ठेवतात.

मात्र हे उपाय ठीक नसल्याने मागील काही वर्षांपासून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु केली आहे. यात शेतकऱ्यांना अवघ्या १ रुपयात विमा उतरवला जात असे बाकी हफ्ता सरकार भरत असल्याने अल्पवधीत या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. अन मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ लागले.परंतु या चांगल्या योजनेचा अनेकजण दुरुपयोग करून सरकारची फसवणुक देखील करत असल्याचे समोर आले आहे.

राज्य सरकारच्या एक रुपयात पीक विमा योजनेचा गैरफायदा खरिपातील कांदा पीक विमा योजनेत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कांदा पीक विम्यासाठी आलेल्या ४ लाख २ हजार ३९८ अर्जापैकी तब्बल १ लाख ७४ हजार ९७२ विमा अर्ज बनावट असल्याचे कृषी विभागाच्या तपासणीत आढळून आले आहे.

त्यातील बनावट कांदा पीक विमा अर्जामधील विमा संरक्षित क्षेत्र ९७ हजार ७६५ हेक्टर आहे. कृषी विभागाने शोधून काढलेल्या या बनावट अर्जापोटी विमा हप्ता भरण्यापोटी शासनाची ७० कोटी पाच लाख रुपयांची बचत झाली आहे.

राज्यातील कांदा पिकाची क्षेत्र तपासणीमध्ये प्रामुख्याने आठ जिल्ह्यांपैकी सात जिल्ह्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, बीडचा अहवाल येणे बाकी आहे. त्यामध्ये पुणे, अहिल्यानगर, धुळे, सातारा, नाशिक, छ. संभाजीनगर, बीड, सोलापूर मिळून एकूण ७५ हजार ७१३ हेक्टरवर कांदा लागवड झालेली आहे. प्रत्यक्षात विमा योजनेत या जिल्ह्यातील कांदा पिकासाठी विमा अर्जाची संख्या ४ लाख २ हजार ३९८ इतकी आहे.

त्यामध्ये तपासणीत १ लाख ७४ हजार ९७२ विमा अर्ज हे अपात्र ठरले आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी कांदा पिकासाठी पीक कर्जदर वेगवेगळा असल्याने प्रतिहेक्टर विमा संरक्षित रक्कम वेगवेगळी आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक असल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यास विहित केलेला विमा हप्तादर हा विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के आहे.

मात्र, राज्य शासनाच्या एक रुपयात विमा योजनेमुळे विमा हप्ता कितीही असलाख तरी शेतकऱ्यास प्रतिविमा अर्ज केवळ एक रुपया भरून पिकांचे विमा संरक्षण मिळते. कांदा पिकासाठी हेक्टरी सर्वाधिक म्हणजे ४६ हजार रुपयांपासून ते ८१ हजार ४२२ रुपयांइतकी विमा संरक्षित रक्कम आहे. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे.

अशी केली जाते फसवणूक

अनेकजण कांद्याची लागवड न करताच दुसऱ्याचा कांदा दाखून त्याचा विमा उतरवतात. तर काहीजण लागवड केलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र दाखून त्याचा विमा उतरवतात. तर काही ठिकणी एकाच क्षेत्रावर दोनपेक्षा अधिक वेळा विमा घेतलेले प्रकार आढळून आले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तर माहिती अभावी या योजनेस प्रतिसाद दिला नसल्याचे देखील या पहाणीतून समोर आले आहे.