Ahilyanagar News : आता लाडकी बहीण योजना आणली; पण भाऊ कोण हेच तिला कळत नाही. प्रत्येकजण मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ असे म्हणत आहेत. मात्र ते भाऊ नसून फुकटखाऊ आहेत. जनतेच्या पैशांवर फुकटखाऊ म्हणतात मीच तुझा भाऊ, असे सध्या सुरू आहे.
आपणही शेतकरी कर्जमुक्ती केली, पण त्याचा असा गाजावाजा केला नाही. आपण आपले काम केले. आता फक्त गाजावाजा होत आहे, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी सरकारवर चढवला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी होत असलेल्या महाअधिवेशनाला ते उपस्थित होते.
त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले आपल्याला सत्तेची चिंता नाही, आपल्याला जनतेच्या आयुष्याची चिंता आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबियांची चिता आहे. सत्ता येते आणि जाते, गेलेली सत्ता परत येणार आहे. नक्की येणार आणि आपण खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार.
यावेळी त्यांनी महायुती आणि राज्य सरकारवर जबरदस्त टीका केली. ते म्हणाले, ज्यांनी विश्वासघात केला, आईसारख्या शिवसेनेवर वार केले, त्यांच्यावर जनता कसा विश्वास ठेवणार? आता हे विश्वासघताकी सरकार घालवून आपले सरकार आणण्याची गरज आहे. ही बदलाची ताकद तुमच्यात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आपले आयुष्य सरकारसाठी, जनतेसाठी वेचल्यानंतर निवृत्ती वेतन मिळणार नसेल, तर काय उपयोग. तुम्ही सरकार बदलू शकता, आपले सरकार आणा, मी वचन देतो, तुमचा न्याय हक्काचा लढा सफल होईल. जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी सुरू करू, असे आश्वासन त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले.
खासदार संजय राऊत म्हणाले, तुमची ही एकजूट अशीच ठेवा. शिवसेनेने कायम कामगारांच्या हितासाठी संघर्ष केला. आम्ही सतत कामगारांची लढाई जिंकत आलो, म्हणूनच हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट टिकून असल्याचे ते म्हणाले. शिवसेना उपनेते सुभाष देसाई, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपल्या भाषणात सरकारचा समाचार घेतला.