Ahilyanagar News : विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जातिवाद प्रचार करून मला पाडण्यासाठी ३६ कोटी रुपये खर्च केले. परंतु कर्जत-जामखेडच्या स्वाभिमानी जनतेने विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडत मला पुन्हा दुसऱ्यांदा निवडून दिले. त्याबद्धल मी मनापासुन सर्वांचे आभार व्यक्त करतो, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त करत भाजपवर जोरदार टीका देखील केली.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच खर्डा शहरात ठिकठिकाणी आ. पवार यांचे आगमन झाल्यावर त्यांचे औक्षण करून फटाके व तोफांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांनी आपल्याला साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत विरोधकांना चांगले खडे बोल देखील सुनावले.

आ. रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, भाजपचे विरोधी उमेदवार गेली साडेचार वर्ष मतदारसंघात फिरकले नाही कोरोनाच्या काळात दिसले सुद्धा नाहीत. तरीही माझा निसटता विजय झाला. पण मी सर्व जाती-धर्माला कामाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले.

सर्वांना बरोबर घेतले, मागेल त्याला पाणी वाटप पूर्ण मतदारसंघात येथे गरज असेल त्या ठिकाणी केले. आरोग्याच्या माध्यमातून लोकांचे साडेतीन कोटी रुपये व अनेक रुग्णांचे १३ कोटी रुपयांची बिले कमी केले, अशा प्रकारे २६ कोटी रुपये मी आजारी लोकांची वाचवले आहेत. लंपीचा रोग आला त्यावेळी एक लाख डोस विकत घेऊन शेतकऱ्यांना मोफत वाटले.

पोलीस स्टेशन मंजुरी त्याला सुविधा दिल्या, वखार महामंडळ गोडाऊन उभारणी केली, संत गीते बाबा संस्थान, संत सिताराम गडासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला. तसेच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघात सर्वात जास्त निधी खेचून आणला. परंतु भाजपचा विरोधी उमेदवाराने ३६ कोटी रुपये निवडणुकीत खर्च करून नेते फोडले, जातीयवाद प्रसार केला व मला पाडण्याचा प्रयत्न केला.

परंतु कर्जत, जामखेडच्या स्वाभिमानी जनतेने मला अल्पशा मतांनी पुन्हा दुसऱ्यांदा निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो व मागील काळात झालेल्या चुका सुधारून पुढील काळात काम करण्याच्या पद्धतीमध्येबदल करणार असल्याचे आ. पवार यांनी यावेळी सांगितले.