Ahilyanagar News : लाडक्या बहिणींचा आशीर्वादच आमच्या विजयाचा मोठा शिल्पकार ठरला आहे. राज्यातील महायुतीच्या विजयाचे श्रेय जनतेला असून विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हला यावेळी जनता बळी पडली नाही. उलट महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवून जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आहे, असे मत सलग आठव्यांदा विजयी झालेले महायुतीचे भाजपाचे उमेदवार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, की जनतेचा कल बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेने पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे, तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे जेवढे बोलघेवडे नेते होते, त्यांनी जनतेचा जनाधार गमावला आहे.

खोटा नॅरेटिव्ह सेट करून संगमनेरचे उमेदवार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माझी व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांची बदनामी केली. शेवटी त्यांचा पराभव करून दहशतीचे झाकण संगमनेरच्या जनतेनेच उडवलं. त्यांनी बळाचा, पैशाचा वापर करून पाहिला; पण काही उपयोग झाला नाही.

सर्वसामान्य नागरिक, शेतकरी बांधव, लाडक्या बहिणी, युवक असे सर्वच मिळून मोठ्या ताकदीने महायुतीच्या सोबत राहिले. त्यामुळे राज्यात महायुतीच्या सर्वाधिक जागा आल्या व सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीला राज्यात सत्तेपासून दूर ठेवले, असे विखे पाटील म्हणाले.

निवडणुकीत भाजप व महायुतीच्या यशाचे श्रेय भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनाच आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपाचे वरिष्ठ नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदीच घेतील. राज्यात खासदार शरद पवारांचा झंझावात कधीच नव्हता.

लोकसभा निवडणुकीत ‘घटना बदलणार’ हा खोटा नॅरेटिव्ह पसरविण्यात आला. त्याला लोकं बळी पडले; मात्र विधानसभेला जनतेने खोटा नॅरेटीव्ह पसरविणाऱ्यांना जागा दाखवून दिली आहे.

अहिल्यानगरमध्येही मतदारांनी बहुमतात महायुतीला कौल देऊन विरोधकांना मतदानातून डावलले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.