Ahilyanagar News : सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरट्यांचा धुमाकुळ सुरु आहे. यात शेतकऱ्यांचे जनावरे,मौल्यवान वस्तू आदींची चोरी केली जात होती आता मात्र शेतकऱ्यांची पिके देखील सुरक्षित नाहीत. सोंगून ठेवलेली जवळपास १३ क्विंटल तूर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे दि. २८ डिसेंबर रोजी उघडकिस आली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चंद्रशेखर श्रीनिवास कुलकर्णी (धंदा नोकरी, रा.कांदा मार्केट, वॉर्ड नं. ६ श्रीरामपूर) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, कुलकर्णी हे शिक्षक बँक श्रीरामपूर येथे नोकरीस असून त्यांची राहुरी तालुक्यातील आरडगाव शिवारात शेत गट नं.१३० (१) मध्ये साडेचार एकर शेती आहे.
सदरची शेती त्यांनी टाकळीमिया येथील संजय धोंडीराम आढाव यांना वाट्याने करण्यासाठी दिली आहे. सदर शेतीमध्ये तुरीचे पीक होते. सदर शेतातील तुरीचे पीक दि. २६ डिसेंबर रोजी सोंगून वाळवण्याकरिता शेतातील शेडमध्ये ठेवलेले होते. २८ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास ते घरी असताना त्यांना वाटेकरी संजय आढाव यांनी फोन करुन कळविले.
आढाव हे दि.२८ डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेडमध्ये काढून ठेवलेल्या तुरीकडे फेरफटका मारला असता तूर शेडमध्ये होती. नंतर ते घरी आले व सकाळी पुन्हा तुरी ठेवलेल्या शेडमध्ये जाऊन पाहिले असता शेडमध्ये सोंगून ठेवलेले तुरीचे पीक दिसले नाही. ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेलेली आहे, असे सांगितले.
कुलकर्णी यांनी तेथे जाऊन पाहिले असता शेंडमध्ये सोंगून ठेवलेले तुरीचे पीक दिसले नाही. तेव्हा त्यांनी आजुबाजुस जवळपास राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली असता कोणतीच माहिती मिळून आली नाही.
तेव्हा त्यांची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सोंगून ठेवलेले जवळपास १३ किंटल अंदाजे ९१ हजार रुपये किमतीचे तुरीचे पीक चोरून नेले आहे. फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.