Ahilyanagar News : शहरातील  नगर अर्बन बँकेच्या सर्व थकबाकीदार कर्जदारांची यादी मोठ्या फ्लेक्स बोर्डवर लिहून असे फ्लेक्स बोर्ड शहरातील मोजक्या आठ ते दहा चौकात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

त्यातील कर्जदारांची नावे जनतेस माहिती होतील व त्याद्वारे यदाकदाचित कर्जदारांची बदनामी होऊ शकते. हे टाळण्यासाठी सर्व कर्जदारांनी योग्य तो प्रतिसाद द्यावा, असे आवाहन बँक बचाव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

संदर्भात नगर अर्बन बँक बचाव समिती सदस्य डी. एम. कुलकर्णी यांनी कर्जदारांना आवाहन केले आहे. त्यात म्हटले आहे की, नगर अर्बन बँक बंद पाडण्यात बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक व काही भ्रष्ट अधिकारी व मोठे कर्ज थकबाकीदार यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

आपण संगनमत करून मोठमोठ्या रकमांचे अनेक प्रकारचे कर्ज घेतले आहे. हे कर्ज भरण्यासही आपण हेतुपुरस्सर टाळाटाळ करीत आहात व केलेली आहे. व अजुनही आपण कर्ज रकमा भरण्याची आपली इच्छा दिसून येत नाही. यास्तव बँकेचे ठेवीदार अधिक आक्रमक झालेले आहेत.

आपल्या कर्जाच्या रकमांची वसुली होण्यासाठी आपणांवर कायदेशीर पोलीसी कारवाई होण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे आपल्या कर्जाची तपशीलासह यादी सादर केली आहे.

पोलीस प्रशासनाकडे ठेवीदार आग्रही मागणी करीत असून सर्व लहान मोठ्या कर्जदारांवर कायदेशीर पोलीस कारवाई करण्यासाठी व आपणांस आरोपी म्हणून जाहीर करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे ठेवीदार पाठपुरावा करीत आहे.

आपणावर आरोपी म्हणून पोलीसी कारवाई होऊन आपणास अटकेची व पोलीसी खाक्याची अंतिम कारवाई होऊ नये असे वाटत असेल तर कर्जाची संपूर्ण रक्कम व्याज मुद्दलासह बँकेत भरून कायदेशीर कारवाई टाळू शकता.

तसेच बँकेने एकरकमी कर्जफेड योजना चालू केलेली आहेच. त्याही योजनेचा फायदा घेऊन आपणाकडील कर्ज रक्कम सत्वर बँकेत भरणा करावी.

अन्यथा १५ ते २० दिवसांच्या अंतिम मुदतीनंतर आपणावर पोलीसी कारवाई निश्चित होण्यासाठी ठेवीदार पोलीस प्रशासनाकडे सर्व मार्गाने प्रयत्न करणार आहोत, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.