Ahilyanagar News : विठ्ठलराव लंघे हे शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्यामुळे जिल्हाध्यक्ष पद रिक्त झालेले आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन १२ जानेवारीला शिर्डीत होत आहे.
यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय नेतेही उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या तयारीचा आढावा शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डी येथे येऊन घेतला.
पक्षाचे अधिवेशन शिर्डीत पार पडत असताना जिल्हाध्यक्ष पद मात्र रिक्त आहे. विठ्ठलराव लंघे हे भाजपचे उत्तरेचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र ते आता शिवसेना शिंदे गटाचे नेवासेचे आमदार आहेत. जिल्हाध्यक्षपदावर आपली वर्णी लागण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.
उत्तरेतून भाजपकडे जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फळीआहे. अकोले, श्रीरामपूर, नेवासे, संगमनेर, राहता व कोपरगाव येथून काही पदाधिकारी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्षाला महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक स्वराज्यमध्ये उमेदवारी वाटपाचे मोठे अधिकार जिल्हाध्यक्षाकडे राहतील.
अशातच जिल्हाध्यक्षपदावर वर्णी लागल्याचे एका नेत्याच्या समर्थकांनी सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले आहेत. मात्र, खुद्द त्या नेत्याने अधिकृत नियुक्तीपत्र सार्वजनिक केलेले नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शिर्डीत शुक्रवारी आलेले होते. त्यावेळी बावनकुळे यांनीही अशी निवड झाल्याचे जाहीर केलेले नाही.
शिर्डीतील पक्षाच्या अधिवेशनाच्या तयारीसाठी कार्याध्यक्षपदावर तात्पुरत्या काळासाठी एखाद्या पदाधिकाऱ्याची निवड केली जाऊ शकते. मात्र, तसेही पत्र अद्याप सार्वजनिक झालेले नाही. त्यामुळे पदाधिकारी संभ्रमात पडलेले आहेत.
तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदावर एका नेत्याची वर्णी लागल्याची चर्चा आहे. काही कार्यकर्त्यांनी नियुक्तीचे फलक प्रसिद्ध केले आहेत. मात्र, पक्षाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्याबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. अद्याप जिल्हाध्यक्षपदावर वर्णी लागल्याचे कोणतेही अधिकृत पत्र पक्षाने प्रसिद्ध केलेले नाही. त्यामुळे हा प्रकार म्हणजे ‘उतावळा नवरा अन घुडग्याला बाशिंग’ असा असल्याचे अनेकजण बोलत आहेत.
दरम्यान याबाबत अकोला येथील भाजप नेते जालिंदर वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, की प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्तीचे सर्वाधिकार आहेत. मात्र, अद्याप कोणाची नियुक्ती झाल्याचे पत्र आपण पाहिलेले नाही. त्यामुळे ठोस माहितीशिवाय या विषयावर बोलता येणार नसल्याचे ते म्हणाले.