Ahilyanagar News : राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विधानसभा निवडणुक शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. रेकॉडवरील गुन्हेगारांची जंत्री जमविण्याचे काम पोलीस दलाकडून सुरू आहे. दुसरीकडे आतापर्यंत विविध गुन्ह्यातील १६२ सराईत गुन्हेगारांना जिल्हा पोलीस दलाने हद्दपार केले आहे.
त्यात सराईत गुन्हेगार, त्यांच्या टोळ्या व दोन गुन्ह्यावरून अधिक गुन्हे दाखल असलेल्यांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार आणि दशहत निर्माण करणाऱ्या सुमारे १३७ सराईत गुन्हेगारांचे हद्दीपारीचे सन २०२३ व सन २०२४ मधील सुमारे १३७ प्रस्ताव उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारीस्तरावर प्रलंबित आहेत. निवडणुकीच्या काळात ते प्रस्ताव निकाली निघण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे. गेल्या १० महिन्यात ४६ जणांना अटक करून त्यांच्याकडून ३५ गावठी कट्टे जप्त केले आहेत. तर, १२६ जणांनी कोयता, तलवार, सत्तुर, चाकू अशी शस्त्रे जप्त केली आहे.
जिल्ह्यातील निवडणुकांचा आतापर्यंतचा इतिहास पाहता अनेक अनुचित घटना निवडणूक काळात आणि निवडणूक झाल्यानंतर घडल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी पोलीस दलाने कंबर कसली आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगार शोधण्याच काम सुरू आहे.जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून प्रत्येक पोलीस ठाणे व उपविभागीय कार्यालयाकडून आढावा घेण्याचे काम सुरू आहे. कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांची दहशत आहे. निवडणुकीच्या काळात काही अनुचित प्रकार घडू शकतो का, याची गोपनीय माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
त्या पार्श्वभूमीवर सुमारे १७ हजार जणांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, १८ जणांविरूध्द एमपीडीए नुसार कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर अशा दहा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणाऱ्या, तलवार, कोयता, सत्तूर, चाकू, गुप्ती असे धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आता निवडणुकीच्या काळात व्यापक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तर विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १३७ अधिकारी व २ हजार १४७ पोलीस अंमलदारांचा बंदोबस्तासाठी समावेश करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी बाहेरून ११० पोलीस अधिकारी व तीन हजार ६६ पोलीस येणार आहेत. तसेच, पोलिसांच्या मदतीसाठी सुमारे तीन हजार होमगार्डचा बंदोबस्त राहणार आहे.