Ahilyanagar news : लाल कांद्याची लागवड केल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात ढगाळ हवामान व धुक्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. बहुतांश भागात लाल कांद्याची काढणी शुरू आहे. परंतु उत्पन्नात मात्र निम्म्याने घट झाल्याचे पाहावयास मिळते. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली तर हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाणार आहे, त्यामुळे लाल कांदा उत्पादक शेतकऱ्याऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अहिल्यानगर तालुक्यात सुमारे पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी व लागवड करण्यात आली; परंतु अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे सर्वच पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली असून, उत्पन्नात घट होणार आहे.
अहिल्यानगर तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारीच्या क्षेत्रात निम्म्याने घट होऊन गहू-हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाली होती. गुलाबी थंडी अन् प्रखर सूर्यप्रकाश, यामुळे रब्बी पिकांना पोषक वातावरण होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे ढगाळ वातावरण तयार झाले असुन, अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या हवामानाचा परिणाम रब्बी हंगामातील सर्वच पिकांवर झाला असून, विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे पहावयास मिळते रब्बी हंगामात तालुक्यात ज्वारी १४ हजार ८०६ हेक्टर, गहू ७ हजार, हरभरा ८ हजार २९६ हेक्टर, मका व इतर चारा पिके ५०० हेक्टर तर गावरान कांद्याची १५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे गहू, हरभरा, गावरान कांदा, लसूण, मका, ज्वारी, चारा पिके तसेच भाजीपाला, या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
तालुक्यातील अनेक भागातील बहुतांश तलाव पूर्ण क्षमतेने भरलेच नव्हते, त्यामुळे अनेक भागात रब्बी पिकांना शेवटी पाणीटंचाईची समस्या जाणवणार आहे. अशातच ढगाळ हवामानाने पिकांवर पडलेल्या रोगांमुळे शेतकऱ्यांची चिता वाढली आहे.
अवकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावल्यास काढणीला आलेल्या लाल कांद्याचे मोठे नुकसान होणार आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी लाल कांद्याची काढणी सुरू असून, लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. रब्बी हंगामातील सर्वच पिकांवर पडलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे पाहावयास मिळते.