Ahilyanagar News : सध्या बाजारात चांगला भाव मिळत असल्याने एकीकडे शेतकरी आनंदित आहेत तर दुसरीकडे खाणारा मात्र कांदा महाग झाला असल्याने सांगत आहे.
मात्र शेतकऱ्यांचा हा आनंद अवघा काही काळापुरताच ठरत आहे, कारण एकीकडे भाववाढ झाल्याने कांदा उत्पादन खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पर्यायाने खाणाऱ्याला व पिकवणाऱ्याला देखील यंदा कांदा रडवत असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या जिल्ह्यात सर्वच भागात कांदा लागवडीला जोमात सुरुवात झाली मात्र शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशातच वाढत्या महागाईमुळे कांद्याचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मजुरी, मशागतीचे वाढते दर याचबरोबर खते, औषधांच्या वाढलेल्या किमतीने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडत आहे.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे कांदा लागवडीचे काम वेगाने सुरू झाले आहे.मात्र कांदा लागवडीसाठी मजूर मिळत नसल्याने मजूर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कांदा लागवडीचे दरही चांगलेच वाढले असून, मजुरांना शेतात आणणे व घरी सोडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या वाहनाच्या व्यवस्थेमुळे खर्चात आणखी भर पडली आहे.
त्यात कांदा बियाणे खरेदीलाही मागील वर्षीच्या तुलनेत अधिक पैसे मोजावे लागत आहेत . खराब व सतत बदलत्या वातावरणामुळे कांदा रोपांची यंदा दुरवस्था झाल्याने औषधे फवारणी करावी लागत आहे, कांदा रोपांची किंमतही वाढलेली आहे. कांदा खुरपणीचे दर, तसेच ट्रॅक्टर मशागतीचे दरही वाढलेले आहेत.
यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात कापूस विक्री केलेला आहे, अनेक शेतकऱ्यांच्या यंदाच्या कापूस उत्पादनात घट आलेली आहे. त्यामुळे यंदा मोठ्या कष्टाने कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळावा अशीच अपेक्षा शेतकरी करत आहेत.
कारण यंदा वाढलेल्या महागाईमुळे कांदा लागवड करण्यासाठी शेतीची मशागत, बियाणे, खुरपणी, फवारणी, लागवड व त्यापुढील असा जवळपास ७० ते ७५ हजार रुपयांचा खर्च येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा खर्च खूप वाढला असल्याचे शेतकरी बोलत आहेत.