Ahilyanagar News : कोरोनाच्या लाटेत सण-उत्सव विसरलेल्या नागरिकांना नववर्षातील नव्या अपेक्षेप्रमाणे यंदा नव्या वर्षातील मकर संक्रांतीचा सणही महागाईच्या चटक्यात साजरा करावा लागणार असून, महागाईची झळ बसत असल्याने तिळगुळाचा गोडवा कमी होणार आहे.
मकर संक्रांत आणि तिळगुळाचे अतूट नाते आहे. मात्र कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने यंदा तिळगुळाच्या दरात २५ टक्के वाढ झाली आहे. यावर्षी तिळगुळाच्या दरात किलोमागे वीस रुपयांनी वाढ झाली असून, तिळाची रेवडी ३० ते ५० रुपये पावशेर दाराने मिळत आहे. मकर संक्रांतीला महिला -हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेतात व महिलांना वाण म्हणून काही वस्तूही देतात. त्या वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. पतंगाच्या किमतीतही यंदा १० ते २० टक्के वाढ दिसून येत आहे.
वाढत्या महागाईमुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गोड बोलण्याचा संदेश देणारा नववर्षातील पहिलाच सण असलेली मकरसंक्रांत अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणासाठी बाजारपेठ सजली आहे. मात्र, यंदा बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध असलेल्या साहित्यांच्या चढया किमती लक्षात घेता संक्रांत सणाला सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
तीळ आणि गुळाचे भाव वाढल्याने संक्रांत गोड करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. सण आला म्हणजे त्यासोबत गोड पदार्थही आलेच. प्रत्येक सणासाठी काही विशिष्ट गोड पदार्थ तयार करण्याची परंपरा आहे. मकरसंक्रांतीला तीळ, गुळाचे पदार्थ तयार केले जातात.
तीळ हे स्वभावाने उष्ण असतात, त्यामुळे नेमक्या थंडीच्या अल्हाददायक हंगामात आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. त्यामुळे तीळ व गुळाचे पदार्थ सेवन केल्याने शरीरात उष्णता तयार होते म्हणून संक्रातीला तीळ व गुळाचे पदार्थ तयार केले जातात. ते एकमेकांना देण्याची व भरविण्याची देखील पद्धत आहे.
संक्रांतीपासून सूर्याचा प्रवास उत्तर दिशेकडे सुरू होतो. अर्थातच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्या दिवसांपासून उत्तरायणाला सुरुवात होते. दिवस हळूहळू मोठा, तर रात्र लहान होत जाते. लोकांच्या मनात स्नेह, आदर व प्रेमाची भावना असावी, त्यासाठी आपण तिळगूळ वाटून आपल्या नात्यांना आणखी मजबूत बनवितो.
हिवाळ्यातील तीळगूळ हे सुपरफूड मानले जाते. कारण तीळ आणि गूळ शरीराला थंडीपासून वाचविण्यासाठी गुणकारी आहेत. आयुर्वेदात गूळ आणि तीळ खाण्याचे फायदे सांगितले आहेत. या दोन्ही गोष्टींपासून शरीरात उष्णता निर्माण होते.