Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत संगमनेर तालुक्यात ४० वर्षानंतर सत्तांतर झाले असून यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा नवखे उमेदवार अमोल खताळ यांनी पराभव केला आहे.
त्यामुळे हा पराभव माजी मंत्री थोरात समर्थकांच्या जिव्हारी लागला आहे. पर्यायाने आता या तालुक्यात माजी मंत्री थोरात व आमदार खताळ समर्थक एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. नुकताच याचा प्रत्यय आला असून, पाणी प्रश्नावरून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आ. खताळ यांच्या समर्थकांमध्ये जुंपली आहे.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार गावांतर्गत असलेल्या गिडेवाडी, पायरवाडी आणि सुतारवाडी येथील आदिवासी समाजास पाण्यासाठी वणवण करावी लागत होती.
याबाबत आमदार अमोल खताळ यांनी प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर प्रांताधिकारी हिंगे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार नागणे यांच्या आदेशानुसार विजेचा पंप दुरुस्त होऊन आदिवासी वाडी-वस्तीवरील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. असे आमदार समर्थक सांगतात.
तर हिवरगाव पठारच्या गिडेवाडी, सुतारवाडी, पायरवाडी येथील पाण्यासाठी थोरात यांनीच पाणीयोजना केली. वीजपंप बंद पडल्याने काही दिवस अडचणी आल्या. ही बाब लक्षात घेऊन थोरात यांनी तातडीने सूचना दिल्याने तीनही वाड्यांवर पिण्याचे पाणी आले. मात्र, ज्यांना अद्याप हे गाव आणि वाडीही माहित नाही, असे नवीन आमदार बातम्या देऊन जनतेत संभ्रम निर्माण करीत असल्याची घणाघाती टीका सरपंच सुप्रिया मिसाळ यांनी केली आहे.
थोरात यांच्या सूचनेवरून पाणीयोजना सुरळीत केल्याचा दावा सरपंच मिसाळ व उपसरपंच वनवे यांनी केला आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आमच्या गावातील वाड्यांसाठी नवीन आमदाराने पाणी दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. ज्या व्यक्तीला अजून आमचे गाव माहित नाही. वाड्या माहिती नाहीत. ते प्रश्न काय सोडवणार? थोरात यांनी सातत्याने विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे केली.
थेट सुतारवाडीपर्यंत उंच भागावर पाणी पोहोचवण्याचे काम केले. विद्युत पंपात बिघाड झाल्याने काही दिवस पाणी येत नव्हते. थोरात यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर यशोधन व संबंधित यंत्रणेने पाठपुरावा केल्याने तातडीने आमचा विद्युत पंप सुरूझाला.