Ahilyanagar News : जिल्ह्यातील बारा जागांसाठी बुधवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदारांपैकी २७ लाख ४२ हजार २७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यातील मतदानाची एकूण टक्केवारी ७२.४७ टक्के आहे. सर्वाधिक मतदान नेवासे मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान अहिल्यानगर शहर विधानसभा मतदार संघात झाले आहे.
मागील वेळेच्या तुलनेत यावेळी जिल्ह्यातील मतदारांनी उच्चांकी संख्येने मतदान केले. जिल्ह्यातील ३७६५ मतदान केंद्रांवर बुधवारी (दि. २०) बारा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या संचालनात जिल्ह्यात अपवाद वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.
आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरा मतदारांची गर्दी झाल्याने मतदारसंघनिहाय मतदानाची अंतिम आकडेवारी मिळण्यास विलंब झाला होता.
मतदानाची अंतिम आकडेवारी संकलित करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. गुरुवारी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघातील मतदानाच्याअंतिम आकडेवारीची अधिकृत माहिती मिळाली.
या आकडेवारीनुसार मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी विधानसभा निवडणुकीतील जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीत तीन टक्क्यांनी वाढ झाल्याचेस्पष्ट झाले आहे. यावेळी नेवासे मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ७९.८४ टक्के मतदान झाले.
त्या खालोखाल शिर्डी मतदारसंघात ७५.८१, संगमनेर ७५.१९, कर्जत- जामखेड ७४.९७, राहुरी ७४.५२, श्रीगोंदा ७३.८५, अकोले ७१.९८, कोपरगाव ७१.३१, श्रीरामपूर ७०.२४, पारनेर ७०.१९, शेवगाव ६९.३६ आणि अहिल्यानगर शहर ६३.८५ टक्के मतदान झाले आहे.
मतदारसंघनिहाय एकूण व झालेले मतदान :
नेवासा – २८३१११- २२६०२९
शिर्डी – २९२९११ – २२२०४६
संगमनेर – २८९१७४ – २१३४३२
कर्जत – जामखेड – ३४७३०३ – २६०३८०
राहुरी – ३२४०५९ – २४१५०४
श्रीगोंदा – ३३९५२६ – २५०७३४
अकोले – २६७५१० – १९२५५६
कोपरगांव – २८९६५६ – २०६५५५
श्रीरामपूर – ३०९१५१ – २१७१५२
पारनेर – ३५०३५० – २४५८९६
शेवगाव – ३७४४४२ – २५९७२२
अहिल्यानगर शहर – ३१६७९४ – २०२२७१