Ahilyanagar News : राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील एका समितीने ठेवला आहे. त्यामुळे लवकरच आता २२ जिल्ह्यांची आणि ४९ नव्या तालुक्यांची निर्मिती करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.
यात अहिल्यानगर जिल्ह्याचे त्रिभाजन, नाशिक, ठाणे जिल्ह्याचे दुजाभन, तर तब्बल १७ जिल्ह्यांचे विभाजन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याची शिफारस समितीने केली असल्याचे समोर आले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात २०१८ मध्ये नवे जिल्हे आणि तालुके निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. वित्त, महसूल, नियोजन विभागाचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने २२ नवे जिल्हे आणि ४९ नवे तालुके निर्मितीचा प्रस्ताव दिला आहे.
१ मे १९६० रोजी राज्याच्यानिर्मितीवेळी २५ जिल्हे होते. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातून दक्षिण सातारा जिल्हा वेगळा करून २१ नोहेंबर १९६० रोजी सांगली हा नवा जिल्हा निर्माण झाला आहे. १९६० ते१९८० या २० वर्षांच्या कालावधीत एक सुध्दा नवा जिल्हा निर्माण झाला नाही.
बॅ. ए. आर. अंतुले यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात १ मे १९८१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग आणिऔरंगाबाद जिल्ह्यातून जालना या दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली. बाबासाहेब भोसले यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात १६ ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर, तर २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूरजिल्ह्याच्या विभाजनातून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली.
शरद पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात १ ऑक्टोबर १९९० रोजी बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्हे करण्यात आले होते. १ जुलै १९९८ रोजी मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम आणि धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदरबार या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.
मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात १ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्यातून हिंगोली आणि भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केली होती.
दरम्यान तासगाव लातूर आणि नांदेड जिल्ह्यांच्या विभाजनातून उदगीर हा जिल्हा निर्माण केला. येत्या २६ जानेवारीपासून हा जिल्हा अस्तित्वात येणार आहे. आता आणखी २१ जिल्ह्यांची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेस वेग येणार आहे. शासन पातळीवर तशा हालचाली गतिमान झालेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात आता अहिल्यानगरचे देखील शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु होईल.