Ahilyanagar News : शहरातील एकमेव असलेल्या उड्डाणपुलावर अपघाताची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. गुरुवारी उड्डाणपुलावरील धोकादायक असलेल्या चांदणी चौकातील वळणावर परत एकदा उसाच्या ट्रकला अपघात झाला. यात सदरचा ट्रक पलटी झाला त्यामुळे या ट्रकमध्ये असलेला सर्व ऊस खाली रस्त्यावर पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरूवारी रात्री (एमएच १६ जी ६०१६) हा ट्रक नेवसा येथून ऊस घेवून दौंड येथे जात होता, हा ट्रक शहरातील उड्डाणपुलावर चांदणी चौकात धोकादायक वळणावर आला असता या वळणावर चालकाचे ट्र्कवरील नियंत्रण सुटले अन हा ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला आणि एक बाजुला कलंडला. त्यामुळे ट्रकमध्ये असलेला ऊस हा उड्डाणपुलाच्या वरील व खाली मोठ्या प्रमाणात पडला.
रस्त्याच्या खाली सर्वत्र उसाचा खच पडला होता, ही घटना झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. सदरची घटना घडली त्यावेळी पुलावर व पुलाच्या खाली देखील अत्यंत कमी वर्दळ होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
जर हा अपघात दिवसा घडला असता तर मात्र मोठा अनर्थ झाला असता. उड्डाणपुलावरील या धोकादायक वळणावर आपवर अनेक अपघात झाले आहेत. दरम्यान अपघाताची मालिका थांबण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी नागरिकांच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.
या वळणावर आतपर्यंत अनेकदा अपघात झाले आहेत. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आलीआहे.