Ahilyanagar News : नुकत्याच झालेल्या विधानसभेत नेवासा मतदारसंघातून निवडून येत आमदार झालेले विठ्ठलराव लंघे हे नेवासा तालुक्‍यातील शिरसगाव येथील रहिवासी असून ते भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष तसेच नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देखील आहेत. यापूर्वी त्यांनी २००४ मध्ये नरेंद्र घुले पाटील यांच्या विरुद्ध तर २००९ मध्ये शंकरराव गडाख यांच्याविरुद्ध भाजपाचे तिकिटावर निवडणूक लढविली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना थोड्या मताने पराभव पत्करावा लागला होता.

त्यानंतरच्या काळात म्हणजे २००९ मध्ये शंकरराव गडाख नेवासा स्वतंत्र मतदार संघाचे आमदार झाल्यानंतर लंघे यांनी गडाख गटामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यात आले होते. परंतु जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपताच त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये आणि नंतर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून जिल्ह्यामध्ये परिचित आहेत.

मागील २१ वर्षे ते राजकीय प्रवाहात तग धरून राहिले आहेत. दोनदा विधान‌सभेला पराभव झाला. पण ते खचून गेले नाहीत. मात्र या विधानसभा निवडणुकीत नशिबाने साथ दिली आणि आमदारकी मिळाली. मात्र तुकाराम गडाख, पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे या माजी आमदारांना या मतदार संघाने पुन्हा आमदारकीची संधी मिळू शकली नाही.

निवडणुकीत विकासकामांना दुर्लक्ष ऐनवेळच्या हवेवर चालणारा अनपेक्षित निकाल देणारा मतदार संघ अशी या मतदार संघाची ओळख आहे. कुकाणे जिल्हा परिषद गट हा लंघे यांचा बालेकिल्ला मानला जातो, गेल्या पाच पंचवर्षीक निवडणुकीत लंघे हेच या गटातून निवडून आले आहेत. लंघे यांचे वडील स्वर्गीय वकीलराव लंघे हेही दहा वर्षे तालुक्याचे आमदार होते.

नेवासा मतदारसंघ भाजपचा राहिलेला आहे. परंतु लोकसभेच्या नियडणुकीत हा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असताना महायुतीचे पराभूत उमेदवार सदाशिव लोखंडे यांना नेवाशातून ३ हजार १२८ मताधिक्य मिळाले होते. हाच आधार घेऊन शिंदे गटाकडून या मतदारसंघावर दावा सांगितला होता.