Ahilyanagar News : सध्या शेतकऱ्यांची शेतात कांदा लागवडीची लगबग सुरु आहे. यात अनेकजण शेतात वाफे करणे तसेच इतर कामे ट्रॅक्टरच्या साहायाने कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. अशीच शेतात काम करत असताना रोटावेटरमध्ये अडकून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या भेर्डापूर या गावात घडली आहे. दिलीप आण्णासाहेब कहांडळ (वय ५०) असे या घटनेत मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सध्या कांद्याला चांगले भाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा लागवड करत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जात आहे. तालुक्यातील भेर्डापूर येथील शेतकरी दिलीप कहांडळ हे रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास कांदा लागणीसाठी रोटावेटरने शेत जमीन तयार करीत होते.

त्यांच्या कुटुंबातील सदस्य ट्रॅक्टर चालवित होते. यावेळी काही काम करत असताना रोटावेटरमध्ये पॅण्ट अडकल्याने दिलीप कहांडळ यांचा पाय रोटावेटरमध्ये ओढला गेला. हि बाब लक्षात आल्यानंतर ट्रॅक्टर बंद करेपर्यंत त्यांचा मांडीपर्यंत पाय रोटावेटरमध्ये ओढला गेला.

गंभीर जखमी अवस्थेतच तेवाइकांनी श्रीरामपूर येथे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

कहांडळ यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अशोक साखर कारखान्याचे माजी चेअरमन भाऊसाहेब कहांडळ व प्रगतशील शेतकरी दत्तात्रय कहांडळ यांचे ते बंधू होत. शेतात काम करत असताना रोटावेटरमध्ये अडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या या घटनेमुळे या भागात शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत.